पनामाचा ध्वज असलेल्या तेलवाहू एमव्ही एंड्रोमेडा स्टार जहाजावर इराण-समर्थित हुथी अतिरेक्यांनी क्षेपणास्त्र हल्ला केला. मात्र भारतीय नौदलाने या हल्ल्याला तत्परतेने प्रत्युत्तर देऊन जहाजावरील सर्व ३० कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित केली.
हूथी दहशतवाद्यांनी लाल समुद्रातील एंड्रोमेडा स्टार तेल टँकर जहाजावर क्षेपणास्त्र डागले होते. भारतीय नौदलाने त्यांना प्रत्युत्तर दिले. या जहाजावर २२ भारतीयांसह ३० कर्मचारी तैनात होते. या मोहिमेसाठी नौदलाची एक स्फोटके आयुधे निकामी करणारे पथक तैनात करण्यात आले होते. सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे नौदलाने सांगितले.
‘भारतीय नौदलाने आयएनएस कोची तैनात करून पनामाचा ध्वज असणाऱ्या तेलवाहू एमव्ही एंड्रोमेडा स्टारवरील हल्ल्याला प्रत्त्युत्तर दिले,’ असे भारतीय नौदलाने सांगितले. हे जहाज भारतीय नौदलाच्या जहाजाने अडवले. परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीने हवाई पाहणीही करण्यात आली.
हेही वाचा..
‘काँग्रेसचा इतिहास कलंकित मात्र तरीही पाहतात सत्तेचे स्वप्न’
हाँगकाँग, सिंगापूरनंतर एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवकडून बंदी
इंदूरमध्ये कॉंग्रेस उमेदवाराचा भाजपात प्रवेश
सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले
‘या जहाजावरील २२ भारतीयांसह ३० कर्मचारी सुरक्षित असून ते त्यांचा पुढील प्रवास करत आहेत. जहाज पुढील बंदरात आपले नियोजित संक्रमण सुरू ठेवत आहे. भारतीय प्रदेशातून प्रवास करणाऱ्याची सुरक्षितता ही भारतीय नौदलाची वचनबद्धता असून भारतीय नौदलाच्या जहाजाने केलेली ही जलद कारवाई त्याचेच उदाहरण आहे,’ असे नौदलाने सांगितले.
गाझा युद्धात इस्रायलशी लढत असलेल्या पॅलेस्टिनी गट हमासला पाठिंबा दर्शवण्यासाठी हौथी अतिरेकी लाल समुद्रातील परदेशी व्यावसायिक जहाजांवर हल्ले करत आहेत.पनामाचा ध्वज असणारे अँड्रोमेडा स्टार हे जहाज ब्रिटिशाच्या मालकीचे होते. नुकतेच हे जहाज सेशेल्समधील कंपनीला विकण्यात आले. हे जहाज रशियाशी निगडीत व्यापाराशी संबंधित असून ते रशियाच्या प्रिमोर्स्क येथून भारतातील वाडिनारकडे जात होते,’ असे हुथीच्या प्रवक्त्याने सांगितले.