नवरात्र हा देवीचा उत्सव. देवी म्हणजे साक्षात स्त्री-शक्ती. नवरात्रीत केली जाणारी नवदुर्गेची पूजा ही एका दृष्टीने स्त्रीचीच पूजा आणि स्त्री शक्तीचा जागर. आपल्या राज्याच्या जडणघडणीतही अशा अनेक स्त्री शक्तींचे मोलाचे योगदान आहे. स्त्री शक्तींचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे नाव घ्यावेच लागेल. बाल शिवरायांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य प्राप्तीचे अत्यंत कठीण आणि अशक्यप्राय असे ध्येय साध्य केलं. १६४२ ते १६७४ या साडेतीन दशकाच्या कालखंडात समाजातील तरुणांना, शेतकऱ्यांना, अठरापगड जाती- जमातींना एकत्र करून शिवरायांसारखा आदर्श राजा त्यांनी घडवला. इतिहास बदलला. त्यांचे हे कार्य लाखमोलाचे आहे.
महाराष्ट्रातील बुलढाण्यामध्ये लखुजी जाधवांच्या घरी १२ जानेवारी १५९८ साली जिजाउंचा जन्म झाला. लहानपणापासूनचं स्वतंत्र विचारांच्या असलेल्या जिजाउंचा भोसले घराण्यातील शहाजीराजे यांच्याशी विवाह झाला. शहाजीराजे हे त्यावेळी निजामशाहीतील प्रमुख सेनापती होते. वडील लखूजी जाधव हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते त्यामुळे त्यांना राजकीय चालींची आणि डावपेचांची जाण होती. समाजात घडत असलेल्या वाईट कृत्यांची त्यांना माहिती होती. याला कुठेतरी पूर्णविराम लागावा यासाठी जिजाउंनी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. बाल शिवरायांवर संस्कार करायला सुरुवात केली. शिवरायांसारखा राजा घडविणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे यातून त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व स्पष्ट दिसून येते.
हे ही वाचा:
दुर्गेचे पहिले रूप ‘शैलपुत्री’ – वृषारुढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्
रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल असं विशाल पाटीलचं काम!
भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला
डेन्मार्कमध्ये इस्रायली दूतावासाजवळ दोन स्फोट
जिजाऊंचा स्वराज्याचा संकल्प, लढाऊ बाणा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी यामुळेच छत्रपती शिवराय घडले. जिजाऊंनी आपल्या विचार आणि कार्यातून महाराष्ट्रात एक नवी सृष्टी निर्माण केली होती. मराठ्यांचा इतिहास घडवणारी एक स्वराज्यप्रेरिका महिला म्हणून त्यांचे स्थान उच्च दर्जाचे आहे. धैर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा हट्ट या गुणवैशिष्ट्यांच्या जोरावर जिजाऊंनी; शहाजीराजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न आपले म्हणून पाहिले आणि शिवरायांना सोबत घेऊन ते पूर्णत्वासही नेले. अशा या स्त्री शक्तीला नमन!