बऱ्याच विलंबानंतर पाम बीच रोड प्रकल्पाच्या घणसोली ते ऐरोली विभागाचे काम अखेर मार्गी लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त केल्या आहेत. त्यामुळे ऐरोली-मुलुंड खाडी पुलापर्यंत रस्ता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोने बेलापूर ते ऐरोली सेक्टर १० ए पर्यंत २१.१२ किलोमीटर लांबीचा पाम बीच रोड प्रकल्प २००४ मध्ये प्रस्तावित केला होता. बेलापूर ते घणसोली हा १९.२० किलोमीटरचा रस्ता सिडकोने बांधला होता, मात्र उर्वरित दोन किलोमीटरचे काम खारफुटीच्या क्षेत्रामुळे रखडले होते.
सिडकोने २००९ मध्ये अपूर्ण पाम बीच रोड प्रकल्पासह घणसोली नोड एनएमएमसीकडे हस्तांतरित केला. मात्र, या प्रकल्पात आजतागायत प्रगती झालेली नाही. आता नवी मुंबई महानगरपालिकेला प्रकल्पासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी, वन विभाग, खारफुटी संवर्धन समिती, पर्यावरण आणि पर्यावरण-संवेदनशील प्राधिकरणांकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. केवळ मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी प्रलंबित असून नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच त्यासाठी अर्ज केला आहे.
उर्वरित रस्त्याचे बांधकाम आता३.४७ किमीचे असेल, ज्यामध्ये खारफुटीच्या क्षेत्रावरील दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचा समावेश आहे. हा रस्ता १.५ किमीने वाढविण्यात येणार असून, अतिरिक्त कामामुळे प्रकल्पाचा खर्च जवळपास दुप्पट झाला आहे असल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेने म्हटले आहे.
हे ही वाचा:
कलम ३७० हटल्यानंतर जम्मू काश्मीरच्या बाहेरील १८५ लोकांनी केली जमीन खरेदी
उत्तरकाशी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली, लोकांचे घाबरून घराबाहेर पलायन
भाजप लक्ष्मणासारखे लोकांचे प्रश्न सोडवतो
हुश्श टेंशन गेलं ईएमआय वाढणार नाही.. रिझर्व्ह बँकेचा व्याज दरवाढीला ब्रेक
पाम बीच रोड प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनामुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि ऐरोली-मुलुंड खाडी पुलापर्यंतच्या विस्तारामुळे विविध भागांशी संपर्क सुधारेल. घणसोली-ऐरोली पाम बीच रोड प्रकल्प या भागातील वाहतूक सुरळीत चालण्यासाठी महत्त्वाचा आहे. ते ऐरोली-मुलुंड पूल आणि निर्माणाधीन ऐरोली-काटई मार्गाला जोडेल, ज्यामुळे वाहनधारकांना कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि इतर भागात प्रवास करता येईल. याशिवाय, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता मदत करेल असे नवी मुंबई महानगरपालिकेने म्हटले आहे.