जमशेदपूरमध्ये श्री राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि झारखंड राज्य अध्यक्ष विनय सिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना रविवारी (२० एप्रिल) घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विनय सिंहच्या हत्येनंतर संतप्त करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिमना रोड आणि राष्ट्रीय महामार्ग ३३ रोखला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, विनय सिंह एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होणार होते. त्यानंतर, गर्दीच्या जागेचा फायदा घेत हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेतील प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि विनय सिंगयांच्यावर गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला.
मृत विनय सिंह हे करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. एक ज्वलंत नेता म्हणून त्यांची ओळख होती आणि ते राज्यभर सक्रिय होते. त्यांच्या हत्येचा संबंध राजकीय आणि सामाजिक संघटनांमधील वाढत्या तणावाशी जोडला जात आहे. पोलिसांकडून याबाबत तपास सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले की, करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विनय सिंह यांचा मृतदेह बालीगुमा येथील राष्ट्रीय महामार्गापासून सुमारे २५० मीटर अंतरावर एका शेताजवळ आढळला. मृतदेहाजवळून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक स्कूटीही जप्त करण्यात आली आहे. विनय सिंगचा मोबाईलही सापडला आहे. विनय सिंग तिथे कसे पोहोचले? त्याची पडताळणी केली जात आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहे आणि हल्लेखोरांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा :
झारखंडमध्ये एक कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षल नेत्यासह आठ नक्षलवाद्यांचा खात्मा
खलिस्तान्यांकडून तिसऱ्यांदा ब्रिटिश कोलंबिया येथील हिंदू मंदिराची तोडफोड
हुथी बंडखोरांवरील हल्ल्याच्या योजना अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी कुटुंबियांसोबत केल्या शेअर?
हिंदी लादली जात नाही, महाराष्ट्रात मराठीच अनिवार्य
दरम्यान, विनय सिंग यांच्या हत्येनंतर क्षत्रिय समाज आणि करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिमना चौक आणि राष्ट्रीय महामार्ग-३३ रोखला. मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. घटनास्थळी पोहोचलेल्या दोन डीएसपींसह पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले. सध्या परिसरात तणाव आहे आणि पोलिस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.