३० मार्च ते ३ एप्रिल २०२२ दरम्यान ४९ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२१ -२०२२ मुंबई येथील श्री हालारी विसा ओसवाल समाज हॉल, दादासाहेब फाळके रोड, रणजीत स्टुडिओ समोर, दादर ( पूर्व ) येथे आयोजित करण्यात आली आहे. मुंबईत या स्पर्धेचे आयोजन करण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.
४७ वी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा २०१९ साली कुडाळ, ४८ वी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा २०२० साली जळगाव व ४९ वी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा आता मुंबई येथे सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने या स्पर्धेच्या आयोजनाची हॅट्ट्रिक करण्याचा विक्रम केला आहे. आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत व इंडियन ऑइल, युनियन बँक, ओ. एन. जी. सी. व हिंदुस्थान पेट्रोलियम सहपुरस्कृत या स्पर्धेत २५ राज्यांचे व १२ संस्थांचे मिळून २७ संघ सहभागी झाले आहेत.
पुरुष एकेरी, महिला एकेरी व सांघिक गटासाठी या स्पर्धेत चुरस होणार असून यजमान महाराष्ट्रातील ६ महिला व ६ पुरुष खेळाडूंसहित प्रत्येक प्रत्येक विभागातून अतिरिक्त ८ खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. आगामी विश्व् अजिंक्यपद स्पर्धा २०२२ च्या अखेरीस मलेशिया येथे संपन्न होणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड, आर बी आय., जैन इरिगेशन, भारतीय आयुर्विमा महामंडळ बरोबरच तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणाचे व महाराष्ट्राचे संघ पुऱ्या ताकदीनिशी स्पर्धेत उतरले आहेत. वैयक्तिक गटात विश्वविजेते प्रशांत मोरे, योगेश परदेशी, आर. एम. शंकरा, एस. अपूर्वा, रश्मी कुमरे, व इलवझकी या खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.
हे ही वाचा:
आपल्या शरीरातही जाते या मार्गाने प्लास्टिक
प्रवीण दरेकरांना पुन्हा दोन आठवड्यांचा दिलासा!
आता नेहरू संग्रहालय असणार ‘प्रधानमंत्री संग्रहालय’! सर्व प्रधानमंत्र्यांचा होणार योग्य सन्मान
छत्तीसगड मधील बलात्कार, खून प्रकरणात बाबा खान अटकेत!
२ वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा जोशात कॅरमची सुरुवात होत असून कॅरम खेळाडू व कॅरम रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धेच्या सामन्यांचे लाईव्ह प्रसारण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहेत. शिवाय मुंबईनगरीत होणाऱ्या या स्पर्धेतील गर्दीचा विचार करत असोसिएशनने प्रेक्षकांसाठी २ मोठे एल. इ. डी. स्क्रीन लावण्याची व्यवस्था केली आहे.
रियाझ आणि मैत्रेयी महाराष्ट्राचे कर्णधार