केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी नवे पाऊल उचलले आहे. ‘नीडल फ्री’ लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना पायलट प्रोजेक्ट म्हणून निवडण्यात आले आहे.
देशभरात लसीकरण मोहिमेला यश मिळत असले तरी सुईच्या भीतीने लसीकरणासाठी टाळाटाळ केली गेली. आता ‘नीडल फ्री’ अर्थात सुईशिवाय देण्यात येणाऱ्या लसीसाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. ‘झायकोव -डी’ या लशीचे ‘नीडल फ्री’ डोस देण्यात येणार आहेत. २८ दिवसाच्या अंतराने तीन डोस दिले जाणार असून नाशिक आणि जळगावला जवळपास ८ लाख डोस मिळणार आहेत.
हे ही वाचा:
प्राजक्त तनपुरे किरीट सोमय्यांच्या रडारवर
…म्हणून पंतप्रधान मोदींनी थोपटली योगींची पाठ
चंद्रावर जाणार भारतीय वंशाचे अनिल मेनन
‘नीडल फ्री’ लसीचे तंत्रज्ञान काय आहे?
नाशिक जिल्ह्यात सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पूटनिक या तीन लसी देण्यात येत आहेत. आता ‘नीडल फ्री’ म्हणून ‘झायकोव-डी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. एका मशीनच्या मदतीने ही लस दिली जाते. त्वचेवर मशीन ठेवली जाते आणि त्यानंतर टोचणी न करता लसीचे घटक शरीरात सोडले जातात.
झायडस कॅडिलाची कोरोना लस झायकोव्ह-डी डीएनए आधारित कोविड लस आहे. या लसीच्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस आहे.