वयोवृद्ध नरी कॉन्ट्रॅक्टर हे भारताचे माजी कर्णधार असले तरी लसीकरणाच्या बाबतीत त्यांना वागणूक मात्र सर्वसामान्यांप्रमाणेच मिळू शकते, याचा प्रत्यय त्यांना लसीकरणादरम्यान आला. ८८ वर्षांचे नरी कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांची आजारी असलेली पत्नी डॉली (८९) कामा रुग्णालयात लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आपल्या मुलासमवेत गेले खरे, पण त्यांना लस संपल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यांचा मुलगा होशेदार कॉन्ट्रॅक्टरने यासंदर्भात सोशल मीडियावर संतप्त होऊन पोस्ट लिहिल्यानंतर आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य नदीम मेमन यांच्या प्रयत्नाने अखेर हा दुसरा डोस मिळाला. मात्र त्याआधी, त्यांना या वयात निष्कारण मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
हे ही वाचा:
ममता बॅनर्जींचे वरातीमागून घोडे
युरेनियम चोरी प्रकरणात एनआयएची एन्ट्री
लसीकरण हा एकच उपाय,टाटा ग्रुपचं मत
हिमांता बिस्व सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री
होशेदार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, माझ्या वृद्ध आईवडिलांची लसीकरणाला नेण्यासाठी तयारी करताना जवळपास तीन तास लागतात. त्यांना चालता येत नसल्यामुळे गाडीची व्यवस्था करावी लागते. जर लसी उपलब्ध नाहीत तर नोंदणीची तारीख कशाला कळविली जाते? हे पहिल्यांदाच घडले नाही. पहिल्या डोसच्या वेळेलाही आम्हाला असेच घरी परतावे लागले होते. मात्र यावेळी संतापाला वाट मोकळी करून द्यावी लागली.
नरी कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या पत्नीला ५ मार्चला पहिली लस देण्यात आली होती. मात्र दुसऱ्या डोससाठी त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. शनिवारी ते ठरल्याप्रमाणे कामा रुग्णालयात दुसरा डोस घेण्यासाठी गेले पण त्यांना रुग्णालयातच घेण्यात आले नाही. अखेर होशेदार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिल्यानंतर एमसीएचे सदस्य नदीम मेमन यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या दुसऱ्या डोसची व्यवस्था केली. त्याबद्दल होशेदार यांनी मेमन यांचे आभार मानले तसेच कामा रुग्णालयाचे डॉ. पालवे यांचेही ऋणी असल्याचे सांगितले.