पूर्वीचे सरकार मोबाईलसारखे हँग; २०१४ नंतर लोकांनी ‘आऊटडेटेड’ मोबाईल सोडले!

नरेंद्र मोदींचा युपीए सरकारला टोला

पूर्वीचे सरकार मोबाईलसारखे हँग; २०१४ नंतर लोकांनी ‘आऊटडेटेड’ मोबाईल सोडले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया मोबाइल काँग्रेस २०२३ च्या ७ व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) हा आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान मंच आहे. यावेळी त्यांनी भारतातील बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल भाष्य केलं.

नरेंद्र मोदींनी देशात ५ जी चा वेगाने प्रसार होत असल्याचं सांगताना २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचं नाव घेत युपीए सरकारला सणसणीत टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आमच्या सरकारच्या काळात ४ जी चा वेगाने विस्तार झाला. तसेच सध्या ५ जी चा देखील विस्तार होत आहे. ६ जी तंत्रज्ञानाच्या बाबतीत देखील आम्ही पुढाकार घेतला असून, याबाबत भारत देश जगाचं नेतृत्व करेल. या सगळ्यात आमच्यावर कोणताही डाग आला नाही, हे विशेष. नाहीतर, २ जी तंत्रज्ञानावेळी काय झालं होतं, हे सर्वांना माहितीच आहे.”

२०१४ हे एक महत्त्वाचं वर्ष आहे. १०-१२ वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्याकाळचे मोबाईल अगदी आउटडेटेड होते. त्यांच्या स्क्रीन सारख्या हँग होत होत्या. परिस्थिती एवढी वाईट होती, की रिस्टार्ट करुन, बॅटरी चार्ज करुन किंवा बॅटरी बदलून देखील फायदा नव्हता. अशीच परिस्थिती त्याकाळच्या सरकारचीही होती,” असा खोचक टोला नरेंद्र मोदींनी लगावला.

“२०१४ नंतर लोकांनी असे आउटडेटेड फोन वापरणं सोडून दिलं आणि आम्हाला सेवेची संधी दिली. या बदलामुळे काय फरक पडला हे स्पष्टच आहे. आधी आपण मोबाईलचे सर्वात मोठे इंपोर्टर होतो मात्र, आता आपण मोबाईल एक्सपोर्ट करतोय. तसंच आपण जगातील दुसरे सर्वात मोठे मोबाईल उत्पादक आहोत,” असे नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या यशाबद्दल देखील आनंद व्यक्त केला. “गुगलने नुकतीच घोषणा केली आहे, की ते आपले पिक्सल फोन भारतात बनवणार आहेत. सॅमसंगचे फोल्ड ५ आणि अ‍ॅपलचे आयफोन १५ हे आधीपासूनच भारतात तयार होत आहेत. एकूणच संपूर्ण जगभरात आता ‘मेड इन इंडिया’ मोबाईल वापरले जात आहेत, या गोष्टीचा सर्वांनाच अभिमान आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा.. 

पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतीप्रिय मलिक यांना अटक

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष

वडाळ्यात सापडला महिलेचा तुकडे केलेला मृतदेह

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “२०१४ पूर्वी देशात सुमारे १०० स्टार्टअप होते. आज ही संख्या १ लाखांच्या वर गेली आहे. अगदी कमी काळात आपण युनिकॉर्न कंपन्यांचं शतक पूर्ण केलं आहे. तर, जगातील टॉप तीन स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये भारताचा समावेश झाला आहे.”

Exit mobile version