भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये जोरदार स्वागत झाले आणि त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत अमेरिका संबंधांच्या नव्या पर्वाचे स्वागत करत हे संबंध म्हणजे सर्वजन हिताय, सर्व जन सुखाय या हेतूने वृद्धिंगत होतील असा विश्वास व्यक्त केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यावेळी आपली भूमिका मांडली आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून जगातील तमाम भारतीयांना संबोधित केले. ते म्हणाले की, व्हाइट हाऊसमध्ये या शानदार समारंभाचे आयोजन करण्यात आले हा १४० देशवासियांचा हा गौरव आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेत राहणाऱ्या ४० लाख भारतीयांचाही हा सन्मान आहे.
मी तीन दशकांपूर्वी अमेरिकेत आलो होतो. तेव्हा मी व्हाइट हाऊस बाहेरून पाहिले होते. पंतप्रधान बनल्यानंतर मात्र अनेक वेळा आलो, पण प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने भारत अमेरिकन समुदायासाठी व्हाइट हाऊसचे दरवाजे प्रथमच उघडण्यात आले आहेत. भारत आणि अमेरिकेतील व्यवस्था लोकशाहीवर आधारित आहेत. आम्ही दोन्ही देश आपल्या विविधतेचा अभिमान बाळगतो. सर्व जनहिताय, सर्व जन सुखाय या सिद्धांतांवर विश्वास ठेवतो. कोविडच्या काळानंतर जग वेगळे रूप घेत आहे. भारत आणि अमेरिकेतील मित्रत्व जगासाठी आदर्श निर्माण करेल. स्थिरता, समृद्धता, यासाठी दोन्ही देश सोबत काम करतील. आमची भागीदारी लोकशाहीच्या ताकदीचे प्रमाण आहे. आम्ही भारत अमेरिका संबंधांबाबत विस्ताराने बोलू. मला विश्वास आहे की नेहमीप्रमाणे आमची चर्चा उपयुक्त ठरेल.
हे ही वाचा:
लाचखोर आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड निलंबित
‘मातोश्री’जवळील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर
कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दोन पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी
नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एकमेकांना आलिंगन दिले. याठिकाणी उपस्थित असलेल्या अनिवासी भारतीयांनी जल्लोषात नरेंद्र मोदींचे स्वागत केले.