पंतप्रधान मोदींनी लता दीदींच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान मोदींनी लता दीदींच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत वाहिली श्रद्धांजली

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवाजी पार्कवर अनेक मान्यवरांसह सामान्य नागरिकांनीही हजेरी लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मुंबईत दाखल झाले होते. सकाळीच त्यांनी ट्विट करत आपण मुंबईला लता दीदींचे अंत्यदर्शन करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले होते. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोदींचा ताफा शिवाजी पार्कवर दाखल झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल होताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवाजी पार्कवर दाखल झाले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लता दीदींना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगेशकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

लता दीदी यांच्या जाण्याने दुःख व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीत अशा भावना नरेंद्र मोदी यांनी सकाळी व्यक्त केल्या होत्या. तसेच त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून निघू शकत नाही, अशा भावना नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर व्यक्त केल्या होत्या.

हे ही वाचा:

हृदयाची तार छेडणारा तारा निखळला

लता दीदींच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

केरळची महिला अबुधाबीमध्ये झाली मालामाल! वाचा सविस्तर

नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही श्रद्धांजली वाहिली. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी लता दीदींच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

Exit mobile version