बाबासाहेब त्यांच्या साहित्यातून कायमच जिवंत राहतील

बाबासाहेब त्यांच्या साहित्यातून कायमच जिवंत राहतील

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास जगताची न भरून निघणारी हानी झाली आहे अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. तर बाबासाहेब त्यांच्या साहित्यातून कायमच जिवंत राहतील असे देखील पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे हे आज म्हणजेच सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी कालवश झाले. वयाच्या १०० वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांच्या निधनाने सारा महाराष्ट्र हळहळल्याचे चित्र दिसत आहे. तर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. मी माझे दुःख शब्दात व्यक्त करू शकत नाही असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. तर बाबासाहेबांमुळे येणाऱ्या पिढ्यांचे छत्रपती शिवरायांशी नाते जोडले जाईल त्यासाठी त्यांचे आभार असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काही महिन्यांपूर्वी बाबासाहेबांच्या शताब्दी सोहळ्याला पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली होती. त्या आठवणींनाही पंतप्रधान मोदींनी उजाळा दिला आहे.

तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाल्याचे म्हटले आहे. “काही वर्षांपूर्वी मला बाबासाहेब पुरंदरे यांना भेटण्याचे आणि विस्तृत चर्चा करण्याचे सौभाग्य लाभले. त्यांची ऊर्जा आणि कल्पना खरोखरच प्रेरणादायी होत्या. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांप्रति माझ्या संवेदना.” असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.

Exit mobile version