फॉर्म्युला वन ही जगप्रसिद्ध शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय फॉर्म्युला वन रेसर नारायण कार्तिकेयन याने नवी भरारी घेतली आहे. तो आता एक यशस्वी उद्योगपती झाला आहे. त्याने सन २०२०मध्ये ड्राइव्हएक्स ही कंपनी उभारली होती आणि अवघ्या दोन वर्षांत त्या कंपनीचे मूल्य १७८ कोटींवर पोहोचले आहे. अर्थात मोटारसायकलच्या निर्मितीतील मोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या भारताच्या टीव्हीएस ग्रुपचे सहकार्य या कंपनीला लाभले आहे.
१४ जानेवारी १९७७ रोजी तमिळनाडूमधील कोइम्बतूर येथे जन्मलेला कुमार राम नारायण कार्तिकेयन हा फॉर्म्युला वन शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय आहे. त्याआधी त्याने एवनजीपी, ब्रिटिश एफथ्री, वर्ल्ड सिरीज, ऑटो जीपी, फॉर्म्युला एशिया, ब्रिटिश फॉर्म्युला फोर्ड आणि ओपेल यांसारख्या शर्यती जिंकल्या आहेत. त्याने सन २००५मध्ये फॉर्म्युला वनमध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. त्याने व्हिलियम्स टीमसाठी दोन वर्षं टेस्ट ड्रायव्हर म्हणून काम केले होते.
शर्यतीच्या या प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने उद्योगजगतात पाऊल टाकले आहे. सन २०२२मध्ये टीव्हीएसने त्याच्या कंपनीतील ४८ टक्के समभाग खरेदी केले. त्यासाठी त्यांनी त्याला ८५.४ कोटी रुपये दिले होते. आता त्याच्या कंपनीचे मूल्य १७८ कोटींवर पोहोचले आहे.
हे ही वाचा:
सत्यपाल मलिक यांच्यावर पाच तास प्रश्नांची सरबत्ती
कुस्तीगीरांच्या आंदोलनात राजकारण शिरले; प्रियांका गांधींनी घेतली खेळाडूंची भेट
महाराष्ट्रातील १९ नागरिक सुदानमधून सुखरूप परतले
…तर बृजभूषण सिंह राजीनामा देण्यास तयार
कार्तिकेयन यांची ड्राइव्हएक्स ही कंपनी सबस्क्रिप्शन तत्त्वावर दुचाकी पुरवते, तसेच दुचाकींची विक्रीही करते. सन २०२०-२१मध्ये या कंपनीची उलाढाल ४७.९८ लाख होती. या दरम्यान कंपनीने तिचा विस्तार पाच शहरांत केला. आधी कुणाची तरी मालकी असलेल्या दुचाकी आणि स्कूटरची विक्री, व्यापार आणि वितरणाच्या क्षेत्रातही कंपनी आहे.
वेणू श्रीनिवासन हे टीव्हीएस मोटार कंपनीचे चेअरमन असून ते भारतातील सर्वांधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. टीव्हीएस कंपनीचे भारतात तीन तर, इंडोनेशियात एक कारखाना आहे.