राजस्थानची नंदिनी गुप्ता ही यंदा ‘मिस इंडिया २०२३’ या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेच्या किताबाची मानकरी ठरली. ५९ वा ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेचा ग्रँड फिनाले शनिवारी मणिपूर येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. नंदिनी पाठोपाठ दुसरा क्रमांक दिल्लीच्या श्रेया पुंजा आणि तिसरा मणिपूरची थोनावजाम स्ट्रेला लुआंग हिने पटकावला. या विजयानंतर नंदिनी संयुक्त अरब अमिरातीत पार पडणाऱ्या ७१ व्या मिस वर्ल्ड सौंदर्यस्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
गेल्या वर्षीची विजेती ठरलेल्या सिनी शेट्टीने ‘मिस इंडिया’चा मुकूट नंदिनीकडे सोपवला. फेमिना मिस इंडियाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर नंदिनी गुप्ताचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
नंदिनी गुप्ताविषयी…
नंदिनी गुप्ता अवघ्या १९ वर्षांची असून ती मूळची कोटाची (राजस्थान) रहिवासी आहे. कोटा हे इंजिनीअरिंग आणि मेडिकल क्षेत्रात शिकणाऱ्यांसाठी देशातील सर्वांत मोठे कोचिंग हब आहे. नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. ती रतन टाटा यांना सर्वांत प्रभावशाली व्यक्ती मानते. ते मानवतेसाठी सर्व काही करतात आणि जे मिळवतात त्यातून बहुतांश रक्कम ते दानधर्मासाठी वापरतात. लाखो लोक त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचा आदर करतात, असे नंदिनीने तिच्या मुलाखतीत म्हटले होते. याशिवाय अभिनेत्री प्रियांका चोप्राकडून प्रेरणा घेत असल्याचेही ती म्हणाली. नंदिनीला लहानपणापासून मॉडेलिंगची आवड होती. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी तिने मिस इंडियाचा किताब जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते.
हे ही वाचा:
देशात कोविडचे १०,०९३ नवे रूग्ण, तरीही किंचित घट
राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी
काँग्रेसला ना उद्धवजींच्या मानाची चिंता, ना मानेची
मिस इंडिया स्पर्धेची वैशिष्ट्ये
मिस इंडिया स्पर्धेत कार्तिक आर्यन, अनन्या पांडे यांसारख्या सेलिब्रिटींनी परफॉर्म केले, तर मनिष पॉल आणि भूमी पेडणेकर यांनी या शोचे सूत्रसंचालन केले. मणिपूरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या दिमाखदार कार्यक्रमाची सुरुवात याआधी मिस इंडियाच्या विजेत्या ठरलेल्या सिनी शेट्टी, रुबल शेखावत, शिनाता चौहान, मानसा वाराणसी, मान्या सिंग, सुमन राव, शिवानी जाधव यांच्या सादरीकरणाने झाली. या स्पर्धेच्या फिनालेमध्ये फॅशन आणि मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अनेक मंडळी ही उपस्थित होती. या स्पर्धेचे परीक्षण नेहा धुपिया, बॉक्सर लैश्राम सरीता देवी, कोरिओग्राफर टेरेन्स, चित्रपट दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी आणि फॅशन डिझायनर्स रॉकी स्टार आणि नम्रता जोशीपुरा यांनी केले.