प्रसिद्ध रानकवी आणि साहित्यिक नामदेव धोंडो महानोर यांचे गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी त्यांच्या पळसखेड या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने अवघ्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासुन ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. तर हृदयविकाराच्या त्रासामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्र लोकप्रिय ठरले. ना. धों. महानोर यांच्या कवितांनी मराठी काव्यप्रेमींच्या मनावर गारूड केलं. पण याचबरोबर त्यांनी मराठी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली होती. १९९५ साली त्यांनी अबोली या मराठी चित्रपटासाठी लिहिलेली गाणी विशेष लोकप्रिय ठरली. त्याचबरोबर एक होता विदूषक, जैत रे जैत, मुक्ता, सर्जा, उरूस, अजिंठा आणि यशवंतराव चव्हाण अशा काही चित्रपटांमधील गाणी लोकांच्या मनात घर करून आहेत.
हे ही वाचा:
चेंबूरच्या आचार्य कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह लिहिणाऱ्या ‘शिदोरी’ वरही गुन्हा दाखल करणार
मुंबईत २६/११ पेक्षा मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा होता कट
ना. धों. महानोर यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले होते.