मुलीची हत्या झालेल्या काँग्रेस नगरसेवकाची नड्डा यांनी घेतली भेट

मुलीची हत्या झालेल्या काँग्रेस नगरसेवकाची नड्डा यांनी घेतली भेट

कर्नाटकमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या २३ वर्षीय मुलीची फयाज नावाच्या तरुणाने हत्या केल्यानंतर या प्रकरणी ‘लव्ह जिहाद’चा मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी या पित्याची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या २३ वर्षीय नेहा या मुलीची हुबळी येथील कॉलेजच्या आवारातच चाकूने हत्या करण्यात आली. ‘मी कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी आलो आहे. ही अतिशय धक्कादायक घटना असून आम्ही तिचा निषेध करतो. मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि गृहमंत्री जी. परमेश्वरा यांची या घटनेसंदर्भातील निवेदने आक्षेपार्ह आहेत. त्यांच्या या विधानाने तपासाला खीळ बसू शकते. अशा प्रकारे लांगुलचालन करणाऱ्या सरकारला कर्नाटकचे नागरिक कधीही माफ करणार नाहीत,’ अशा शब्दांत नड्डा यांनी भावना व्यक्त केल्या.

‘कर्नाटकचे पोलिस या घटनेचा तपास करण्यास सक्षम नसतील तर, राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करावा. हिरेमठ यांचाही पोलिसांवर विश्वास नसल्याने त्यांनीही या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी केली आहे,’ असे नड्डा म्हणाले.

२३ वर्षीय नेहा ही काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी होती. ती बीव्हीबी कॉलेजमध्ये मास्टर्स ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशनच्या पहिल्या वर्षाला होती. आरोपी फयाझ हा देखील २३ वर्षांचा असून तो नेहाचा माजी वर्गमित्र होता. त्याला अटक करण्यात आली आहे.

फयाझने भर कॉलेजच्या आवारात नेहावर चाकूचे वार करून तिथून पलायन केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. कॉलेज प्रशासन आणि अन्य विद्यार्थ्यांनी नेहाला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र तिला उपचाराआधीच मृत घोषित करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यात राहणारा फयाझ हा गेल्या काही दिवसांपासून नेहाचा पाठलाग करत होता. त्याने दिलेला लग्नाचा प्रस्ताव तिने नाकारला होता.

हे ही वाचा:

बुरखा घालणं, कपाळावर कुंकु न लावणं याबाबतीत दबाव टाकून कर्नाटकात धर्मांतराचा प्रयत्न

यापुढे मी शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही!

‘हिंदुत्व सोडणाऱ्यांनी गाण्यात तरी ‘जय भवानी’ शब्द का वापरावा’

‘ईडीच्या कार्यक्षमतेत २०१४नंतर सुधारणा’

तर, कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी नेहा आणि फयाझ यांचे प्रेमसंबंध होते. ते बिघडल्यामुळे ही हत्या झाल्याचा दावा केला होता. या हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलनाचे अस्त्र हाती घेतले होते. तसेच, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Exit mobile version