१२०० कादंबऱ्यांचे लेखक, रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक कालवश

१२०० कादंबऱ्यांचे लेखक, रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक कालवश

तब्बल बाराशे मराठी कादंबऱ्यांचे लेखक तसेच सुप्रसिद्ध रहस्यकथाकार व गोमंतकीय लेखक गुरुनाथ नाईक यांचे बुधवारी निधन झाले. नाईक हे ८४ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. १६ वर्षांपूर्वी मेंदूचा पक्षाघात झाल्यानंतर त्यांना काहीही लिहिता आलं नाही. त्यांच्यावर मागील वर्षी मुंबईतील केईएम रुग्णालयातही उपचार करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही.

मराठीतल्या आघाडीच्या रहस्यमय आणि थरारक कादंबऱ्यांचे लेखक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनीही हजारांवर रहस्य कादंबर्‍या लिहिल्या. त्यांच्या रहस्यकथांचा एक मोठा वाचकवर्ग होता. रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे १९५७ ते १९६३ या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणार्‍या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.

 

हे ही वाचा:

अखेर कोवॅक्सीनला जागतिक मान्यता

आता मला कोणतीही माहिती देण्याची इच्छा नाही

‘समीर वानखेडेंचा संबंधच नाही, फसवणूक करणारा किरण गोसावीच आहे’

मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव घेत आत्महत्या, तरी साधी चौकशीही नाही

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचे वर्णन करणारी ५०० पानांची कांदबरी त्यांनी लिहिली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरही ‘नरकेसरी’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. याचबरोबर एलओसीवरील ‘धगधगती सीमा’, ओसामा बीन लादेनवरील ‘इस्लामी ड्रॅगन’अशाही कादंबऱ्याही त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून लिहिल्या गेल्या.

गुरुनाथ नाईक हे मूळचे गोव्याचे होते. ते लातूर येथे बरीच वर्ष दैनिक एकमतचे संपादक होते. याशिवाय, त्यांनी पुणे तरूण भारत, पुणे सकाळ, मनमाडमध्ये दैनिक गावकरी, औरंगाबादेत दैनिक अजिंठा, गोव्यात दैनिक गोमंतक, नवप्रभा अशा विविध दैनिकांत कामे केली. नोकरी सोडून त्यांनी शिलेदार ही प्रकाशन संस्था सुरू केली.

Exit mobile version