‘आदिपुरुष’ चित्रपटातील संवादावरून या चित्रपटाला ट्रोल करण्यात आले. सर्व स्तरांवरून या चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. संवादलेखक मनोज मुंतशिर यालाही टीकेला सामोरे जावे लागले. या ट्रोलिंगनंतर मनोज यांनी हात जोडून माफी मागितली आहे.संवादलेखक मनोज मुंतासिर यांनी ट्वीट करून साधू-संत आणि श्रीरामभक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. ‘आदिपुरुष चित्रपटामुळे भावना दुखावल्या आहेत, हे मी मान्य करतो. सर्व भाऊ-बहीण, ज्येष्ठ, साधू-संत आणि श्रीराम भक्तांची मी हात जोडून माफी मागतो. बजरंग बलीची कृपा सर्वांवर कायम राहो. आपल्या सर्वांना एकजूट राहून आपल्या पवित्र अशा सनातन आणि महान देशाची सेवा करण्याची शक्ती मिळो,’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता. चित्रपटाचे आगाऊ बुकिंगही जोरात झाले होते. मात्र प्रेक्षकांची निराशा झाली. चित्रपटाच्या संवादावरून प्रेक्षक नाराज झाले. मनोज यांनी चित्रपटाचे संवाद रामायणाच्या काळानुसार नव्हे तर आताच्या बोलीभाषेनुसार लिहिल्याने प्रेक्षकांनी नापसंती दर्शवली. त्यामुळे हे संवाद लिहिणाऱ्या मनोज मुंतशिर याला प्रेक्षकांच्या रागाचा सामना करावा लागला. ट्रोलिंग सुरू झाल्यानंतर त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरणही दिले होते. मात्र आता त्यांना माफी मागावी लागली आहे.
हे ही वाचा:
सांताक्रूझच्या बड्या रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरांचा लैगिंग छळ, सहकारी डॉक्टर विरोधात गुन्हा
नीलम गोऱ्हे अंधारेंवर नाराज की उद्धव ठाकरेंवर
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे दोन्ही क्रिकेट संघ खेळणार
वादानंतर संवाद बदलले
चित्रपटात हनुमान, रावण, इंद्रजीत या व्यक्तिरेखांचे संवाद ऐकून प्रेक्षकांनी या चित्रपटांवर बंदी आणण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयानेही याबाबत सेन्सॉर बोर्डावरही ताशेरे ओढले होते. त्यानंतर चित्रपटकर्त्यांनी या चित्रपटाचे संवादही बदलले. आताही या बदललेल्या संवादानुसारच, ‘आदिपुरुष’ चित्रपट चित्रपटगृहांत दाखवला जात आहे. मात्र तरीही चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला आहे.