वक्फ कायद्याला काही ठिकाणी विरोध केला जात असताना तबलिगी जमातच्या एका गटाचे प्रमुख असलेले मुस्लिम विद्वान आणि उपदेशक मुहम्मद साद कंधलवी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, इस्लाम कोणत्याही परिस्थितीत देशाविरुद्ध बंड करण्यास परवानगी देत नाही. खरा मुस्लिम कायदा मोडू शकत नाही किंवा देशाविरुद्ध काहीही करू शकत नाही, असे विधान त्यांनी केले आहे. हरियाणातील मेवात येथे झालेल्या तबलिगी जमातच्या तीन दिवसीय अधिवेशनाला मुहम्मद साद कंधलवी संबोधित करत होते. या अधिवेशनात हजारो मुस्लिम उपस्थित होते. या अधिवेशनात धर्मोपदेशक आणि विद्वानांनी इस्लामच्या मूलभूत शिकवणी, त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्या आणि राष्ट्राप्रती निष्ठा यांचा पुनरुच्चार केला.
संसदेने मंजूर केलेल्या वक्फ सुधारणा कायदा, २०२५ विरोधात संसद सदस्यांकडूनही निदर्शने केली जात आहेत. तर देशातही अनेक ठिकाणी विरोध दर्शवला जात आहे. या पार्श्वभूमीवर मौलाना साद यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. मौलाना साद म्हणाले, “इस्लाम हा शांती आणि बंधुत्वाचा धर्म आहे, जो कोणत्याही परिस्थितीत देशाविरुद्ध बंड करण्यास परवानगी देत नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, खरा मुस्लिम कोणत्याही परिस्थितीत कायदा मोडू शकत नाही किंवा देशाविरुद्ध काहीही करू शकत नाही.” तसेच त्यांनी उपस्थितांना धर्माच्या तत्वांचे पालन करण्याचे आणि समाजात चांगुलपणा आणि शांतीचा संदेश पसरवण्याचे आवाहन केले.
Big Statement by Maulana Saad, head of Tablighi Jamaat:
"Islam does not permit rebellion against the nation. Muslims must respect and follow the laws of the land." pic.twitter.com/oQdZQkTyLn
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) April 22, 2025
हे ही वाचा..
बांसुरी स्वराजच्या बॅगेवर ‘नॅशनल हेराल्डची लूट’; पोहोचल्या संसदेत
सपा-काँग्रेस ‘महिला-विरोधी मानसिकतेचे’
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी पाहिला जयपूरचा आमेर किल्ला
मौलाना साद यांनी पुढे सांगितले की, अल्लाह आज्ञा न मानणाऱ्यांना क्षमा करत नाही. तसेच त्यांनी मुस्लिम महिलांना इस्लाममध्ये शिक्षण देण्याची गरज यावरही भर दिला. ते म्हणाले की, मुलींना इस्लामिक तत्त्वांवर शिक्षण दिले पाहिजे आणि मुस्लिमांनी त्यांच्या मुलांना मशिदीत घेऊन जावे आणि त्यांना धर्माच्या मूलभूत गोष्टी शिकवाव्यात. तीन दिवस चालणाऱ्या या मेळाव्याच्या शेवटच्या दिवशी मौलाना साद यांनी भारतात शांतता, न्याय आणि मानवता टिकून राहावी यासाठी प्रार्थना केली.