उत्तर प्रदेशमधील नऊ विधानसभा जागांवर २० नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामुळे चर्चांना उधाण आले आहे. समाजवादी पक्षाच्या वतीने पत्र लिहिण्यात आले आहे की, मतदानादरम्यान मुस्लिम महिलांचा बुरखा काढून त्यांची तपासणी करू नये. शिवाय ओळखपत्र तपासण्याचा अधिकार पोलिसांना नसून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आहे, असं पत्रात नमूद करण्यात आले आहे.
समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशचे प्रमुख श्याम लाल पाल यांनी मंगळवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (सीईओ) पत्र लिहून कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याने मतदाराचा मतदार ओळखपत्र तपासू नये, अशी मागणी केली. समाजवादी पक्षाच्या नेत्याने असाही आरोप केला की, “लोकसभा निवडणुक २०२४ दरम्यान, मतदान केंद्रांवर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर केला. सपा समर्थकांना, विशेषतः मुस्लिम महिला मतदारांना त्यांचे बुरखे काढायला लावले, ज्यामुळे महिलांमध्ये भीती निर्माण झाली. त्यांपैकी अनेकांनी मतदान न करता मतदान केंद्र सोडले. सपा समर्थकांची लक्षणीय संख्या त्यांच्या मतदानाचा अधिकार न वापरता परत आली, ज्यामुळे निवडणुकीवर परिणाम झाला आणि मतदान केंद्रांवर मतदानाची संख्या कमी झाली,” असं ते म्हणाले.
श्याम लाल पाल यांनी असाही दावा केला की नऊ विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघांमध्ये, विशेषतः मुस्लिम समुदायांमध्ये सपा समर्थकांची वस्ती असलेल्या भागात बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर्स) द्वारे मतदार स्लिप वितरित केल्या गेल्या नाहीत. मोठ्या संख्येने मतदारांना त्यांचे बूथ क्रमांक आणि मतदार अनुक्रमांक माहीत नसतात, ज्याचा निवडणुकीवर परिणाम होत आहे. मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागू नये यासाठी मतदार स्लिपचे १०० टक्के वितरण सुनिश्चित केले पाहिजे.
हे ही वाचा :
आचारसंहितेच्या काळात कारवाई दरम्यान ६६० कोटींची मालमत्ता जप्त
व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील आरोपी सिराज मोहम्मदचे दुबईत व्यवसायांचे जाळे
मणिपूर: केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त ५० तुकड्या होणार तैनात
सुनियोजित पत्रकार परिषदेत अदाणींनी केली राहुल गांधीची सुटका…
२० नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या नऊ विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. त्याचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. यूपीमध्ये ज्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे त्यात कटहारी (आंबेडकर नगर), करहाल (मैनपुरी), मीरापूर (मुझफ्फरनगर), गाझियाबाद, माझवान (मिर्झापूर), शिशमाऊ (कानपूर शहर), खैर (अलिगड), फुलपूर (प्रयागराज) यांचा समावेश आहे. आणि कुंदरकी (मुरादाबाद) यांचा समावेश आहे.