नव्वदच्या दशकात आपल्या सदाबहार संगीताने लोकांना भुरळ घातलेल्या नदीम-श्रवण या संगीतकार जोडीपैकी श्रवण राठोड यांचे निधन झाले आहे. त्यांना कोविडने ग्रासले होते. मुंबईतील रहेजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांची झुंज अपयशी ठरली.
जगभरात उसळलेल्या कोविड महामारीमुळे लाखो सामान्य माणसांसोबतच अनेक दिग्गजांनाही हिरावून घेतले. याच महामारीमुळे गुरुवार, २२ एप्रिल रोजी प्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांनी या जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोविडचे उपचार सुरु होते. गेले दोन दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. दोन दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. गुरुवारी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. आशिकी, दिल है के मानता नहीं, साजन, दिवाना अशा एका मागोमाग एक सुपरहिट चित्रपटांचे संगीत नदीम-श्रवण जोडीने दिले होते. आशिकी, राजा हिंदुस्थानी, साजन, दिवाना या चित्रपटांसाठी तर त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले आहेत. श्रवण यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. श्रवण यांनी अखेरची मुलाखत ‘न्यूज डंका’लाच दिली होती.
नदीम शोकाकुल
माझा ‘शानू’ आता या जगात नाही, नदीम-श्रवण जोडीतील नदीम सैफी यांनी दूरध्वनीवरून रडत प्रतिक्रिया व्यक्त केली. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, आम्ही एकत्र वाटचाल केली. आम्ही या वाटचालीत चांगले दिवस पाहिले आणि वाईट दिवसही. एकमेकांपासून आम्ही कधीही वेगळे झालो नाही. एकमेकांतली जवळीक कधीही कमी झाली नाही आणि कुणी आम्हाला दूर करूही शकले नसते. आता मात्र एक मोठी पोकळी माझ्या आयुष्यात निर्माण झाली आहे. माझा मित्र, इतक्या वर्षांचा माझा सोबती आज माझ्यासोबत नाही. गेले काही दिवस आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. तो आजारी असल्याचे त्याने मला सांगितले होते. तेव्हापासून मी त्याच्याशी बोलत होतो. श्रवणचा मुलगा आणि बायकोही रुग्णालयात आहेत. पण मी त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही. मी हतबल आहे. माझ्या मित्राला अखेरचा निरोप!
हे ही वाचा:
रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला सर्वाधिक कोटा, पण ठाकरे सरकारचे रडगाणे सुरूच!
लस निर्यातीवरून प्रियांकांचे किळसवाणे राजकारण