कोकण म्हणजे अनेक हरहुन्नरी कलाकारांचे उगमस्थान. अनेकांनी कोकणच्या या भूमीतून झेप घेत कलाक्षेत्र गाजवले. त्यातील एक नाव म्हणजे संगीत दिग्दर्शक बाबानंद (तात्या) धोपटे. श्रीनिवास खळे, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम केलेले बाबानंद धोपटे यांचे नुकतेच वृद्धापकाळामुळे निधन झाले आणि कोकणाने संगीतक्षेत्रातला एक दर्दी गमावला.
बाबानंद धोपटे हे ८३ वर्षांचे होते. गेला काही काळ ते आजारी होते. अखेर १ जानेवारी २०२४ला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी मेघा धोपटे, मुले दिनेश आणि योगेश, सुना तसेच नातवंडे असा परिवार आहे.
बाबानंद धोपटे हे मूळचे मिठबावचे. पण त्यांचे बालपण मुंबईत गेले. त्यांनी शिक्षणही मुंबईत घेतले. त्यांचे सुहृद आप्पा लोके यांनी आपल्या या मित्राच्या संगीतप्रेमाची कहाणी सांगितली. ते म्हणाले, बाबानंद ११वी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. गिरणी कामगारांचे प्रमुख केंद्र असलेल्या लालबाग भागात ते वाढले. कुंभार चाळीत ते वास्तव्यास होते. तिथे स्वस्तिक बँडपथकातून ते वादन करीत. क़ॉर्नेट वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता. चुलत भाऊ सदानंद धोपटे ट्रम्पेट वाजवत. सगळे कुटुंब संगीताच्या क्षेत्रात होते. त्यावेळी बँडपथकामुळे त्यांना विविध वाद्ये वाजविण्याची गोडी लागली. मग सॅक्सोफोन ऍकॉर्डियन, ट्रम्पेट, तबला, ढोलकी, कीबोर्ड अशा सगळ्याच वाद्यांवर त्यांनी हुकुमत गाजविली.
याच ज्ञानाचा उपयोग करत ते मुलांना मार्गदर्शन करू लागले. तिथे शिरोडकर शाळेत ते मुलांना संगीत शिकवत असत. टाटा हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत ते कामाला लागले. पण त्यानंतर ते संगीत प्रशिक्षणाचे काम करतच होते. लोके म्हणाले की, लग्नकार्यात, विविध शुभकार्यात बँड पथकातून ते आपली कला सादर करत असत. त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. नोकरी सांभाळून त्यांनी हे काम केले.
हे ही वाचा:
जपानच्या भूकंपाने जागवल्या २००४च्या महाप्रलयाच्या आठवणी!
अंबिका मसालेच्या अध्यक्षा कमल परदेशी यांचे निधन
भारत सरकारने ‘तहरीक-ए-हुर्रियत’ला दहशतवादी संघटना घोषित केल्याने पाकिस्तानचा जळफळाट!
पत्रकार परिषद सुरू असतानाचं दक्षिण कोरियाच्या विरोधी पक्ष नेत्यावर हल्ला
म्युझिक ग्रामर तथा संगीत व्याकरण हे पुस्तक बाबानंद यांनी लिहिले. त्यातून संगीताचे शास्त्रीय ज्ञान संगीतप्रेमींना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याप्रमाणेच श्रीनिवास खळे यांच्या मार्गदर्शनाखालीही त्यांनी काम केले. खळे यांना ते आपले गुरू मानत असत. त्यांच्यासोबत बरेच काम त्यानी केले. सुप्रसिद्ध गायक जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर यांच्यासोबतही त्यांनी काम केले.
विविध ठिकाणी त्यांच्या वाद्यवादनाचे कार्यक्रमही त्यांनी सादर केले. मराठी चित्रपटसृष्टीचे प्रख्यात संगीतकार राम कदम यांच्यासोबतही त्यांनी जुन्या चित्रपटांत त्यांनी सहाय्यक म्हणून भूमिका बजावली.