पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी वक्फ (दुरुस्ती) कायद्याविरुद्ध हिंसक निदर्शने झाली. हिंदूंना लक्ष्य करण्यात आले यामुळे अनेक लोकांनी कुटुंबीयांसह स्थलांतर केले. परिस्थिती निवळल्यानंतर आता लोक माघारी परतू लागले आहेत.
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर उपविभागातील धुलियान शहरातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागात बीएसएफ आणि सीआरपीएफसह सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आणि अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की परिस्थिती आता नियंत्रणात आहे. स्थानिकांनी हिंसाचारादरम्यान झालेल्या गोंधळाची माहिती दिली असून अनेक दुकाने आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
एका दुकानदाराने एएनआयशी बोलताना सांगितले की, “माझी संपूर्ण इमारत उध्वस्त झाली आहे. काचेचे तुकडे झाले असून इमारतीचा मागचा भाग कमकुवत होता. त्याला लाकडी खिडक्या आणि दरवाजे होते. ते तोडून आंदोलक आत घुसले. त्यांनी नासधूस करत काही सामानही लुटले. इमारतीच्या समोरचं माझे एक दुकान आहे. त्या दुकानाचे शटरही तोडण्यात आले. माझ्याकडे सुमारे १३.५ लाख रुपये रोख होते. रोख रक्कम बँकेत जमा करायची होती, पण ती सर्व चोरीला गेली. त्याशिवाय, माझ्या दुकानात खुर्चा, टेबल, सीपीयू, संगणक आणि लॅपटॉपसह ७-८ लाख रुपयांचे फर्निचर आणि उपकरणे होती. एकूण, माझे सुमारे २०-२५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.”
आणखी एक स्थानिक दुकानदार, अधिर रवी दास यांनी सांगितले की, “माझ्या दुकानाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. काहीही शिल्लक राहिले नाही. प्रशासनाने मदत केली तर आम्ही दुकान उघडू शकू, नाहीतर काहीही करता येणार नाही. दुकानात ६-७ लाख रुपयांचे साहित्य होते; सर्व काही जळून खाक झाले आहे. आम्हाला शांतता हवी आहे. बीएसएफ येथे असल्याने परिस्थिती सामान्य आहे. बीएसएफला येथून हटवले तर काय होईल हे आम्हाला माहित नाही. आम्हाला येथे बीएसएफ कॅम्प हवा आहे.” दुकानदार हबीब-उर-रहमान म्हणाले की, परिस्थिती सुधारली असून समसेरगंजमधील परिस्थिती आता सामान्य आहे. प्रशासन आम्हाला आमची दुकाने उघडण्यास आणि शिस्तबद्ध राहण्यास सांगत आहे. बीएसएफ आणि सीआरपीएफ तैनात केल्यानंतर परिस्थिती बदलली आहे, असे ते म्हणाले.
हे ही वाचा :
इस्रायल- हमासमधील युद्धबंदीची चर्चा फसली; ‘ही’ आहेत कारणे
केकवर गुन्ह्याची कलमे लिहून गुंडाचा वाढदिवस
मध्य प्रदेश: हिंदू धर्माच्या प्रभावामुळे अन्वरने इस्लाम सोडून स्वीकारला सनातन धर्म!
… अन् मोहित्यांना दिसला मोत्यांमध्ये राम
मुर्शिदाबादमधील धुलियान येथील रहिवासी प्राजक्ता दास यांनी म्हटले की, “आम्हाला शांतता आणि सुरक्षितता हवी आहे आणि ही परिस्थिती का उद्भवली हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आम्हाला येथे केंद्रीय दलांचा कायमचा तळ हवा आहे.”
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने मुर्शिदाबाद, मालदा आणि बीरभूम जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. याशिवाय, केंद्र सरकारने सुमारे ३०० बीएसएफ जवान तैनात केले आहेत आणि अतिरिक्त पाच कंपन्या देखील पाठवण्यात आल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्रीय सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.