पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या हिंसाचारात पिता-पुत्राची हत्या करण्यात आली होती. आता या खून प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (१५ एप्रिल) दुपारी पत्रकार परिषदेत घेत दक्षिण बंगालचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) सुप्रतिम सरकार यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कालू नदाब आणि दिलदार नदाब अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघेही भाऊ आहेत.
अधिकारी सुप्रतिम सरकार यांनी सांगितले की, आरोपी कालू नदाब हा बिरभूमच्या मुराराई भागातील रहिवासी आहे आणि दिलदार नदाब हा सुती पोलिस ठाण्याअंतर्गत बांगलादेश सीमेला लागून असलेल्या परिसरातील रहिवासी आहे. हे दोघेही हरगोविंद दास आणि चंदन दास यांच्या हत्येत थेट सहभागी होते. हत्येच्या घटनेनंतर दोघेही फरार होते. अखेर दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.
दरम्यान, वक्फ कायद्याविरुद्ध मुर्शिदाबादमध्ये उसळलेल्या हिंसाचारात शमशेरगंज परिसरात हरगोबिंद दास (७४) यांच्या घरावर अचानक काही गुन्हेगारांनी हल्ला केला. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेला त्यांचा मुलगा चंदन दास याच्यावर देखील हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात वडील आणि मुलगा यांचा घराबाहेर मृत्यू झाला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा :
सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध MUDA प्रकरणात पुढील चौकशीचे आदेश
‘मोदी काफीर आहेत, त्यांना मत देणारेही काफिर’
बंगाल वक्फ हिंसाचारात बांगलादेशी बदमाशांचा सहभाग!
‘हिंदू देवतांमध्ये शक्ती असती तर आक्रमकांना शाप देत नष्ट केले असते!’
वक्फ सुधारणा कायद्यावरून हिंसाचाराची कोणतीही घटना घडू नये म्हणून मुर्शिदाबाद जिल्ह्यात, जांगीपूर, धुलियान, सुती आणि शमशेरगंज येथे बीएसएफ, सीआरपीएफ, राज्य सशस्त्र पोलिस आणि रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत. गेल्या ४८ तासांत या भागात हिंसाचाराची कोणतीही नवीन घटना घडलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, दंगलग्रस्त भागातील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे.