कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताला तिसऱ्या दिवशी सावरले ते मुंबईकरांनी. मुंबईच्या अजिंक्य रहाणेच्या ८९ धावा आणि त्याला शार्दुल ठाकूरची (५१) मिळालेली तोलामोलाची साथ यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाच्या ४६९ धावांना उत्तर देताना २९६ धावांपर्यंतच मजल मारली. इंग्लंडच्या ओव्हलवर सुरू असलेल्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या पहिल्या डावानंतर भारत १७३ धावांनी पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या पहिल्या डावानंतर ऑस्ट्रेलियाने या सामन्यात वर्चस्व मिळविले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४६९ धावांना उत्तर देताना भारताने दुसऱ्या दिवशी ५ फलंदाज गमावून १५१ धावा केल्या होत्या. एकूणच भारताची अवस्था बिकट होती. पण मुंबईकर दोन खेळाडूंनी भारताचा डाव सावरला आणि अगदीच लाज जाण्यापासून भारतीय संघाला वाचविले. अजिंक्य रहाणेने १२९ चेंडूंत ८९ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
हे ही वाचा:
इजिप्तमध्ये पर्यटकाला शार्कने नेले पाण्यात ओढून; व्हायरल व्हीडिओमुळे थरकाप
संजय राऊतांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक
चित्रा वाघ संतापल्या, आव्हाड नाही…हाड हाड!
पाकिस्तान सीमेवर ३७ कोटींचे हेरॉईन जप्त
तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी निराशाजनक राहिली. यष्टीरक्षक श्रीकर भरत झटपट बाद झाल्यानंतर भारताची स्थिती ६ बाद १५२ अशी झाली होती. त्यावेळी भारत २०० धावांचा टप्पा तरी ओलांडेल का अशी भीती होती. पण अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर (५१) यांनी १०९ धावांची भागीदारी करून भारताला अडीचशेचा टप्पा ओलांडून दिला. अजिंक्य रहाणेने आपल्या कसोटी कारकीर्दीतील ५ हजार धावांचा टप्पाही यादरम्यान ओलांडला. त्याची ही ८३वी कसोटी आहे. त्याचे शतक पूर्ण होईल अशी अपेक्षा असताना कर्णधार कमिन्सने त्याचा अडथळा दूर केला आणि नंतर मात्र भारताच्या आशा संपुष्टात आल्या. शार्दूलने त्यानंतर आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या अर्धशतकी खेळीत ६ चौकारांचा समावेश होता. शमीनेही शेवटी १३ धावांची भर घातली.
ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. आता हा सामना वाचविण्यासाठी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळण्याचे आव्हान भारतासमोर असेल.
स्कोअरबोर्ड
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ४६९
भारत पहिला डाव २९६ (अजिंक्य रहाणे ८९, रवींद्र जाडेजा ४८, शार्दूल ठाकूर ५१, कमिन्स ८३-३)