मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज मुंबई लोकल संदर्भात नवीन घोषणा केली. १ फेब्रुवारीपासून लोकलसेवा आम जनतेसाठी खुली करण्यात येणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. परंतु वेळेची मर्यादा अजूनही तशीच राहणार आहे. सामान्य नागरिकांसाठी लोकलमधून प्रवास करण्याची वेळ सकाळी सात पूर्वी, दुपारी बारा ते चार मध्ये आणि रात्री ९ नंतर अशी ठरवण्यात आली आहे.
मार्च २०२० पासून मुंबईची ‘लाईफलाईन’ मानली जाणारी लोकल बंद आहे. अनलॉक सुरु झाल्यापासून मुंबईत वाहतूक पुन्हा सुरु झाली. पण मुंबईत लोकल सेवा मात्र बंदच होती. प्रवाशांना सोशल डिस्टंसिंग पाळता यावे म्हणून लोकल बंद ठेवल्या होत्या. परंतु मुंबईतील कंपन्या आणि कार्यालये सुरु झाल्यावर बसेसमध्ये प्रचंड गर्दी होऊ लागली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने एसटीच्या बसेस मुंबईत चालवायला सुरवात झाली. पण त्यामुळे बस चालकाला मार्ग माहिती नसण्यापासून ते एसटीमुळे होणाऱ्या प्रदूषणापर्यंत अनेक समस्या निर्माण झाल्या. शिवाय हे सर्व उपाय करूनही गर्दी अजूनही तशीच राहिली.
सरकारने २९ जानेवारीपासून लोकल सेवा पूर्णपणे कार्यरत होणार असल्याचे जाहीर केले होते. ज्यामुळे कोविड-१९ पूर्वीच्या संख्येने लोकल गाड्या धावणार आहेत. परंतु आम जनतेला लोकल सुरु होण्यासाठी १ फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. १ फेब्रुवारीनंतरही ठराविक वेळेतच आम जनतेला प्रवास करता येणार आहे.