मुंबईकर नव्या आयुक्तांना म्हणतायत ‘थोडा सास तो लेने दो सर’

मुंबईकर नव्या आयुक्तांना म्हणतायत ‘थोडा सास तो लेने दो सर’

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी त्यांच्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेच काही महत्त्वाचे निर्णय घेतले. नागरिकांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणे, नियम पाळल्यास वाहने टोइंग करणे बंद करणे, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवल्यास दखलपात्र नोंदवणे असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि त्यामुळे त्यांच्यावर मुंबईकरांनी कौतुकाचा वर्षाव केला आणि टोमणाही मारला.

पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी काही अपवाद वगळता मुंबईकरांना पोलीस ठाण्यात बोलावले जाऊ नये, असे ट्विट आयुक्त संजय पांडे यांनी केले. त्यानंतर मात्र नेटकऱ्यांनी संजय पांडे यांचे कौतुक केले. इतक्या झटपट बदलांची आम्हाला सवय नाही असे म्हणत ‘थोडा सास तो लेने दो सर’ असे नेटकऱ्यांनी म्हटले.

शनिवारी संजय पांडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पासपोर्ट पडताळणीसाठी आम्ही निर्णय घेतला असून कागदपत्रे अपूर्ण असणे इत्यादी अपवादात्मक प्रकरणांव्यतिरिक्त मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलावले जाणार नाही. तसे घडल्यास माझ्याकडे तक्रार करा,’ असे त्यांनी म्हटले. त्यानंतर काही नागरिकांनी त्यांना प्रश्न देखील विचारले. नागरिकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली. त्यानंतर खुश झालेल्या नेटकऱ्याने ‘इतक्या कमी वेळात इतक्या झटपट बदलांची आम्हाला सवय नाही, थोडा सास तो लेने दो सर’ असे म्हटले. तर एकाने ‘आप अब तक कहा थे सर’ असे म्हटले. तुमचा कार्यकाळ वाढवण्यासाठी काही याचिकेची तरतूद आहे का? अशी विचारणाही एका नेटकऱ्याने केली आहे.

संजय पांडे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर अनेकांनी त्यांना पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या वेळी आलेले अनुभव शेअर केले. लांब रांगा, संबंधित अधिकाऱ्यांच्या मागे मागे करणे, असे अनेक अनुभव नागरिकांनी मांडले.

Exit mobile version