मुंबई आणि परिसरात सोमवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. येत्या काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईतील वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडल्याचे चित्र आज दिवसभरात होते. ठिकठिकाणी पावसाने पाणी भरले होते. रेल्वे स्थानकात लोकलच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे दिवसभर प्रवाशांची मोठी गर्दी होती. गेल्या सहा तासात मुंबईमध्ये ३०० मिमी पेक्षा जास्त पाउस झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घ्गेऊन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना केल्या.
हवामान खात्याने पुढील तीन ते चार तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईकरांसाठी हा सावधगिरीचा इशारा मानला जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पावसाच्या पाण्याचा निचरा होणार नाही. त्यामुळे रस्त्यांवर आणखी पाणी साचू शकते. त्यामुळे आता मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे मानले जात आहेत.
सकाळपासून जोरदार पाउस सुरु झाल्यामुळे मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
हेही वाचा..
वरळी अपघात प्रकरण – मिहीर शहा विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी!
काश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांनी घरातील कपाटाच्या मागे खोदला होता बंकर
वरळी हिट अँड रन प्रकरणातील राजेश शाह यांना जामीन मंजूर !
मदनी यांच्या स्पष्टोक्तीनंतर तरी भाजपाचे डोळे उघडतील काय?
या मुसळधार पावसामुळे शहराची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पाणी साचले होते. त्यामुळे मुंबई-ठाणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर ओसरल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली, मात्र, ही वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मोठी गर्दी जमली होती. दुसरीकडे हार्बर रेल्वेमार्गावर चुनाभट्टी मार्गावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हार्बर मार्गावर अनेक ट्रेन्स एकापाठोपाठ रुळांवर उभ्या होत्या. याचा कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांवर परिणाम झाला.
नागरिकांच्या मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळीच नियंत्रण कक्षातून मुंबईतील विविध भागातील पावसाची माहिती घेतानाच महामार्ग, रेल्वे, प्रमुख रस्ते येथील परिस्थितीचा देखील आढावा घेतला. या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एरवी मुंबईत ६५ मिलिमीटर पाऊस झाला की अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होते. मात्र रात्रीपासून २६७ ते ३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने रेल्वे मार्ग आणि चुना भट्टी, सायन याभागात पाणी साचले.. साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी रेल्वेने आणि मुंबई महानगरपालिकेने पंप बसविले आहेत.
एकाच वेळी एवढा पाऊस झाल्याने त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या होल्हिंग पाँण्डस् मुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचले नसल्याचे सांगत मायक्रो टनेलिंग सारखा प्रयोग देशात पहिल्यांदा केल्यामुळे निचरा होण्यासाठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सकाळपासून आपण रेल्वे, मुंबई महानगरपालिका, राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, मुंबई पोलिस आयुक्त यांच्या संपर्कात राहून परिस्थितीची माहिती घेत होतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईतील सुमारे ५ हजार ठिकाणांवर मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी फिल्डवर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मिठी नदीच्या ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात येत असून त्यामुळे भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही. पंपाने साचलेले पाणी नदीत टाकण्याची यंत्रणा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत सात ठिकाणी पंपिंग स्टेशन करण्यात येत असून नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.