मुंबईत अजून २४ तास पावसाची शक्यता

मुंबईत अजून २४ तास पावसाची शक्यता

तौक्ते चक्रीवादळ निघून गेल्यानंतरही मुंबईत मंगळवारी पावसाची शक्यता आहे. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांसह आजुबाजूच्या परिसरातील आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरीही बरसत आहेत. याशिवाय, वारेही नेहमीपेक्षा वेगाने वाहत आहेत. वातावरणाचा एकूणच नूर पाहता मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे सोमवारी दिवसभर मुंबई, उपनगर आणि ठाण्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला होता. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. आजही अशाचप्रकारेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दादर टीटी परिसरात आज पहाटेपासून बरसत असलेल्या पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. आजही दक्षिण मुंबई मुसळधार पाऊस झाल्यास हा परिसर पूर्णपणे जलमय होण्याची शक्यता आहे.

वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. काल दिवसभरात चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडल्या. परिणामी अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झालेला आहे.

सलग पडणाऱ्या पावसाने शहरातील अनेक सखल भागांत दोन फूट पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नालासोपारा निलेमोरे गाव, वसई समता नगर, नवजीवन, सतीवली, विरार विवा कॉलेज रोड यासह अन्य भागात काही प्रमाणात पाणी साचले आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झापडं मुंबई-बारामती पुरती

देशात ३ लाखांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण

पालिकेच्या ग्लोबल टेंडरला शून्य प्रतिसाद

कोविन आता प्रांतिक भाषांमध्येही उपलब्ध होणार

मुंबईत मंगळवारी दिवसभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच मुंबईत येत्या काही तासांत ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईवरील धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही.

Exit mobile version