गेल्या पाच वर्षांत बेपत्ता आणि अपहृत झालेल्या ९९ टक्के अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. वडाळ्यातून गायब झालेल्या तीन वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी करताच अवघ्या २६ मिनिटांत पोलिसांनी तिचा शोध घेतला होता. तर, अपहरण झालेल्या पाच वर्षांच्या मुलीला अवघ्या ४८ तासांत तिच्या आईकडे सोपवण्यात यश आले होते. सन २०१८ ते सन २०२३ या पाच वर्षांत पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे अनेक कुटुंब समाधान व्यक्त करत आहेत.
गेल्या पाच वर्षांत मुंबई पोलिसांकडे १८ वर्षांखालील मुलीच्या अपहरणाचे किंवा बेपत्ता असल्याचे सुमारे सहा हजार ७३५ गुन्हे दाखल झाले. त्यातील सहा हजार ६४९ म्हणजे तब्बल ९८.७ टक्के गुन्ह्यांमध्ये मुलीचा माग काढण्यात किंवा त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांच्या पाच प्रशासकीय विभागामध्ये दक्षिण विभागाचे गुन्हे उकल होण्याचे प्रमाण सर्वांत चांगले राहिले आहे. या विभागात दाखल गुन्ह्यांतर्गत ३३९ पैकी ३३६ बेपत्ता अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात यश आले आहे. तर, उत्तर प्रभाग म्हणजे गोरेगाव ते दहिसर पोलिस ठाण्याचे गुन्हे उकलीचे प्रमाण सर्वांत कमी आहे. या पोलिस ठाण्यांतर्गत सुमारे एक हजार ९३९ मुली बेपत्ता होत्या. त्यातील १९०० मुलींचा माग काढण्यात यश आले असून अद्याप ३९ बेपत्ता आहेत.
हे ही वाचा:
कोचीमध्ये ख्रिस्ती प्रार्थनासभेत स्फोट, एक व्यक्ती ठार
उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण!
अपात्र झाले तरी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार!
आर्थिक चणचणीतून सुरतमध्ये एकाच कुटुंबातल्या सात सदस्यांची आत्महत्या
तर, दक्षिण झोन आणि पश्चिम झोनचे गुन्हे उकलीचे प्रमाण १०० टक्के आहे. दक्षिण झोन अंतर्गत येणाऱ्या पोर्ट झोनमध्ये अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता आणि अपहरणाचे गुन्हे दाखल होते. त्यातील सर्वच्या सर्व मुली सापडल्या आहेत. तर, पश्चिम झोनमधील म्हणजेच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि सांताक्रूझ पूर्व हे परिसर येणाऱ्या झोन आठमध्येदेखील गुन्हेउकलीचे प्रमाण १०० टक्के राहिले आहे. यातील सर्व ३५८ बेपत्ता आणि अपहृत मुलींचा शोध लागला आहे.
चेंबूर, गोवंडी ते मानखुर्दपर्यंत पसरलेला झोपडपट्टीचा समावेश झोन ६मध्ये होतो. येथेही गुन्हेउकलीचे प्रमाण ९८ टक्के आहे. सुमारे एक हजार १६४ बेपत्ता मुलींपैकी एक हजार १४१ मुली सापडल्या आहेत. पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी या यशाचे श्रेय पोलिसांच्या तपासपद्धतीला दिले आहे.
‘मुंबईतील सर्व ९३ पोलिस ठाण्यांना बेपत्ता मुली आणि महिला शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे तसेच, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले होते, असे चौधरी यांनी सांगितले. महिला आणि बालविकास मंत्रालयालने सन २०१६मध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी वापरावयाची नियमावली जाहीर केली होती. पोलिस ठाण्यांकडून या नियमावलीचा बारकाईने अवलंब केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक झोनच्या उपायुक्तांना अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा बारकाईने आढावा घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्याचा परिणाम गुन्हेउकलीचे प्रमाण वाढण्यावर झाल्याचे चौधरी यांनी सांगितले.