देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर दहशतवाद्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा नजर टाकली आहे. शहरात आगामी सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी माहिती केंद्रीय एजन्सीने राज्याच्या पोलीस प्रशासनाला दिली आहे. केंद्रीय एजन्सीच्या सूचनांनंतर मुंबईला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. धार्मिक स्थळांसह गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, आम्हाला गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर ‘मॉक ड्रिल’ आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व डीसीपींना त्यांच्या संबंधित झोनमधील सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी (२७ सप्टेंबर) पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट परिसरात मॉक ड्रिल केले. हा एक असा परिसर आहे जिथे प्रचंड गर्दी असते आणि दोन प्रमुख धार्मिक स्थळेही आहेत.
हे ही वाचा :
हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद नसरल्ला ‘ठीक-ठाक’, परंतु मुलगी झैनब ठार?
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताने पाकिस्तानला फटकारले !
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, लष्कराच्या तीन जवानांसह एक पोलीस जखमी!
‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये!
आगामी सण आणि निवडणुका लक्षात घेता, क्रॉफर्ड मार्केट आणि मुंबईतील इतर ठिकाणी मॉक ड्रील घेण्यात येत आहेत, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सर्व मंदिरांना सतर्क राहण्यास सांगितले आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून संशयास्पद हालचालींची तक्रार करण्यास सांगितले आहे.