मुंबईवर नामुष्की; ओमानने जिंकली मालिका

मुंबईवर नामुष्की; ओमानने जिंकली मालिका

टी-२० क्रिकेट मालिका

भारतातील रणजीत सर्वाधिक विजेतीपदे जिंकणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाच्या कामगिरीची घसरगुंडी सुरू आहे. ओमानच्या दौऱ्यावर असलेल्या मुंबईच्या संघाला यजमान संघाकडून मालिकेत १-२ अशी हार सहन करावी लागली. तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० लढतीत मुंबईवर ओमानने तीन विकेट्सनी मात केली. एकेकाळी ऑस्ट्रेलियासारख्या संघालाही सराव सामन्यात खडे चारणाऱ्या मुंबईला ओमानकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

ओमानने या मालिकेतील सलामीचा सामनाही जिंकला होता. पण दुसऱ्या सामन्यात मुंबईने परतफेड करत मालिका बरोबरीत आणली होती. पण शुक्रवारचा दिवस मुंबईचा नव्हता. ओमानने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजी सोपविली. मुंबईचा संघ २० षटकांत ७ बाद १३५ धावाच करू शकला. त्यात ओमानच्या आकीब इलियासने २२ धावांत मुंबईचे ३ फलंदाज टिपले आणि सर्वोत्तम कामगिरी केली. मुंबईकडून आकर्षित गोमेलने सर्वाधिक ३४ धावा केल्या. ओमानच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. सुजित नायक (२५), चिन्मय सुतार (१९), हार्दिक तामोरे (१६) हे मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. त्यामुळे मुंबईचा डाव दीडशे धावांच्या आतच कोलमडला.

हे ही वाचा:

संजय राऊत हे साधे नगरसेवकही नाहीत

काँग्रेसच्या नसीम खान यांनी लांडेंविरोधात केलेल्या याचिकेत उद्धव ठाकरेंचाही उल्लेख

धुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव

उड्डाणपूल झाले खड्ड्यांनी बेजार

त्यानंतर ओमानने मात्र आत्मविश्वासपूर्ण सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. त्यात इलियसने १७ तर जतिंदरसिंगने २८ चेंडूंत ४६ धावा केल्या. पण नंतर इलियास बाद झाल्यावर मुंबईने ओमानच्या चार फलंदाजांना झटपट बाद केले आणि ओमानची स्थिती ५ बाद ९५ अशी झाली आणि नंतर त्यांची अवस्था ७ बाद ११२ अशीही झाली. मुंबईच्या दृष्टिपथात विजय होता. पण संदीप गौड (ना. २०) आणि कलिमुल्ला (ना. ९) यांनी आठव्या विकेटसाठी २४ धावांची भर घालत मुंबईचे स्वप्न उद्ध्वस्त केले.

Exit mobile version