मुंबई आणि उपनगरातील सर्वसामान्य चाकरमान्यांची लोकल प्रवासाची प्रतिक्षा आता संपणार आहे. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलचा प्रवास करणे शक्य होणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या संबंधीची घोषणा केली. १५ ऑगस्टपासून मुंबईतील सर्वसामान्य माणसाला लोकलचा प्रवास करणे शक्य व्हावे यासाठी निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. पण हा प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांना कोविड लसीचे दोन्ही डोस घेणे मात्र बंधनकारक असणार आहे.
मुंबईत निर्बंध शिथील करून कार्यालय सुरू करण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकल मात्र खुली करण्यात आली नव्हती. यामुळे मुंबईकरांचे खूपच हाल होताना दिसत होते. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने यासाठी आवाज उचलला होता. लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी यासाठी भाजपाने आंदोलन छेडले होते. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत अशाच प्रकारची मागणी केली होती. सर्वसामान्य जनता आणि विरोधी पक्षांच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल प्रवास सुरु करणे भाग पडले आहे.
हे ही वाचा:
केवळ दोन डोस घेतलेल्यांनीच मॉलमध्ये जा…..वाचा सविस्तर!!
‘मुख्यमंत्र्यांच्या घोषणेआधीच उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय; ही तर श्रेयाची लढाई’
सावधान ! डासांचे आक्रमण सुरू झाले आहे
नॉटिंगहॅम कसोटी: भारताची स्थिती चांगली…पण वातावरण खराब
रविवार, ८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या संबंधीची घोषणा केली. लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. पण त्यासाठी नागरिकांना सरकारच्या एका ॲपवर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. अशा नोंदणीकृत नागरिकांना लोकलचा पास देण्यात येईल. तर ज्यांच्याकडे मोबाईल फोन्स नाहीत अशा नागरिकांसाठी ऑफलाईन रजिस्ट्रेशनची सुविधाही असणार आहे.