मुंबईकरांची लाईफ लाईन धावणार १०० टक्के क्षमतेने

मुंबईकरांची लाईफ लाईन धावणार १०० टक्के क्षमतेने

मुंबईकरांची लाईफ लाईन असणाऱ्या मुंबई लोकल आता आपल्या १००% क्षमतेने धावणार आहे. राज्यातील लसीकरण वाढून कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर सरकार मार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सोयीचा होणार असल्याचे म्हटले जात आहे. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सरकार मार्फत ही पावले उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

जगभर पसरलेली कोरोना महामारी ही आटोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतातही दिवसेंदिवस लसीकरणाचे प्रमाण वाढत चालले असून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. अशातच सर्व कारभार हा पूर्ववत होत असताना मुंबईकरांच्या प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि सोयीचे साधन असणारी मुंबई लोकल आता पूर्ववत होत आहे.

नुकताच मुंबई लोकल मधून एका दिवसात साठ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोना पूर्व काळात लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या संख्येपेक्षा हा आकडा फक्त पंचवीस टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे या गर्दीचे विभाजन व्हावे या हेतूने राज्य सरकारकडून मुंबई लोकलची मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची सेवा आता आपल्या पूर्ण क्षमतेनिशी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८ तारखे पासून मुंबई लोकल आपल्या १००% क्षमतेने धावणार आहे. या आधी मुंबई लोकांच्या केवळ ९५ टक्के फेर्‍या होत होत्या.

हे ही वाचा:

आर्यन खानला आज जामीन मिळणार?

विधानसभेला कधी मिळणार ‘अध्यक्ष महोदय….’?

भाडेवाढीतून एसटीला मिळणार इतके कोटी

आयकर विभागानेही पूर्ण केले १०० कोटींचे टार्गेट

कोरोना महामारीच्या काळात सुरुवातीला मुंबई लोकलवर निर्बंध घालण्यात आले असून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुविधा उपलब्ध होती. तेव्हापासूनच लोकलच्या फेऱ्या या सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली होती. पण कोरोनाची दुसरी लाट आल्यावर पुन्हा लोकल वर निर्बंध घातले गेले. सुरुवातीला लोकल ही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होती. तर १५ ऑगस्ट पासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वांना लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. त्यातच आता आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत शंभर टक्के क्षमतेने लोकल फेऱ्या सुरू करण्यात येत आहे.

Exit mobile version