राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या करो या मरो सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे मुंबई इंडियन्स संघाचे स्पर्धेतील आव्हान टिकून राहिले आहे. तर दुसरीकडे स्पर्धेतील त्यांचा नेट रन रेट देखील वाढला आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या तीन गोलंदाजांनी टाकलेली १२ षटके या सामन्यात निर्णायक ठरली आहेत.
आयपीएल २०२१ मध्ये मंगळवार ५ ऑक्टोबर रोजी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये सामना रंगला. दोन्ही संघांसाठी हा तेरावा सामना होता. मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघाच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. मुंबईच्या गोलंदाजांनी कमी धावा देत राजस्थान संघाला बाद करण्याची किमया करून दाखवली. मध्यमगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईल, जिमी नीशम यांनी पॉवर प्ले नंतरच्या षटकांमध्ये अप्रतिम कामगिरी करत राजस्थान संघाची दाणादाण उडवली. तर मुंबईच्या गोलंदाजीचा पाठकणा असलेल्या जसप्रीत बुमराहनेही सुरेख गोलंदाजी केली. या तिघांनी टाकलेल्या १२ षटकांमध्ये हे केवळ ३८ धावा दिल्या तर ९ विकेट घेतल्या. हाच मुंबईच्या विजयाचा पाया ठरला.
हे ही वाचा:
गांधीनगर महापालिकेत भाजपाच सरस
तळकोकणात राणेच किंगमेकर! वेंगुर्ला नगरपालिकेत महाविकास आघाडीला धक्का
ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!
रावणाची भूमिका करणारे त्रिवेदी यांचे निधन
मुंबईच्या फलंदाजांसमोर असलेले ९१ धावांचे आव्हान हे त्यांनी अगदी लिलया पार केले. यावेळी मुंबईचा उद्देश फक्त सामना जिंकण्याचा नसून रन रेट सुधारण्याचाही होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच मुंबईचा संघ फटकेबाजी करताना दिसून आला. ईशान किशनने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर मुंबई संघाने अवघ्या ८.२ षटकात हे लक्ष्य पार केले. ईशानने २५ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या. त्यामुळे मुंबई संघाने आठ गडी राखून विजय मिळवला.