मुंबई पुन्हा विजयी ट्रॅकवर

मुंबई पुन्हा विजयी ट्रॅकवर

आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आला आहे. पंजाब किंग्सच्या संघाला सहा विकेट्सने पराभूत करत मुंबई संघाने दोन गुण आपल्या नावे केले आहेत. या विजयामुळे मुंबई संघाच्या खात्यात जमा असलेल्या एकूण गुणांची संख्या १० वर गेली असून मुंबईचे आयपीएल स्पर्धेतील आव्हान हे टिकून राहिले आहे. सध्या मुंबईचा संघ स्पर्धेच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

२८ सप्टेंबर रोजी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये सामना रंगला होता. मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या सुरवातीला पंजाबचा संघ हा सावध खेळात होता. पण मुंबईचा स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याने एकाच षटकात पंजाबचा कर्णधार के.एल.राहुल आणि धोकादायक अशा ख्रिस गेलला बाद केले. पोलार्डने संपूर्ण सामन्यात हे एकमेव षटक टाकले जे टर्निंग पॉईंट ठरले.

या दोन धक्यांनंतर मर्क्रमने पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने ४२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर दीपक हूडानेही २८ धावांचे योगदान दिले. २० षटकांत पंजाब संघाने १३५ धावांची मजल मारली. तर त्या बदल्यात त्यांचे ६ गाडी बाद झाले होते.

हे ही वाचा:

…अखेर ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड इतिहासजमा

भारतीय लष्कराची ‘आकाश’ गवसणी

नवजोत सिंह सिद्धू यांची ‘हिट विकेट’

शिक्षण विभागातील १० पैकी ९ अधिकारी मुस्लिम

१३६ धावांचे विजयी लक्ष्य साध्य करण्यासाठी मुंबईचा संघ मैदानावर उतरला. पण यावेळी रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला तर त्या पाठोपाठ सूर्यकुमार यादवही बाद झाला. रवी बिश्नोईने लागोपाठ दोघांना बाद केले. पण सौरभ तिवारी आणि हार्दिक पांड्याने मुंबईला विजयापर्यंत नेले. तिवारीने ४५ धाव केल्या तर पांड्या हा ४० धावांवर नाबाद राहिला. तर अखेरच्या क्षणात फटकेबाजी करून पोलार्डने मुंबईचा विजय निश्चित केला. पोलार्डच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

Exit mobile version