राज्यात रस्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. मंत्री भोसले यांनी आज विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री भोसले म्हणाले की, राज्याची सर्वांगीण प्रगती ही पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. राज्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून, चुकीच्या पद्धतीने काम होत असेल किंवा जमीन हस्तांतरणात अडचणी येत असतील तर त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणे राज्याच्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने या महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचा पुनरुच्चार मंत्री भोसले यांनी केला.