मुंबई शहरातील आगीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने कठोर पावले उचलली आहेत . अग्निसुरक्षा विषयक नियमांचेपालन ए करणाऱ्या निवासी इमारती, हॉटेल आणि व्यावसायिक आस्थापनांसह ४४ मालमत्तांना नोटिसा पाठवल्या आहेत. मुंबई अग्निशमन दलाने विशेष मोहीम राबवून सुमारे ६४ इमारती आणि ३८४ हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांची तपासणी केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
गेल्या दोन महिन्यांत मुंबई आणि उपनगरात ७५० आगीच्या घटना घडल्या; त्यापैकी काही मोठ्या आगी होत्या. उंच इमारतींमध्ये एकतर निकामी अग्निशमन यंत्रणा, निकृष्ट दर्जाचे पाण्याचे पाईप्स आहेत किंवा अनेक वर्षांपासून अग्निशमन यंत्रणेच्या देखभालीची कामे केली नाहीत असे अनेक अपघातांमध्ये आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलाने एक विशेष मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत ६-८ एप्रिल दरम्यान निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांची तपासणी करण्यात आली होती.
. या मोहिमेत ४६ निवासी आणि ३५८ व्यावसायिक मालमत्ता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत आहेत, जे एक चांगले लक्षण आहे. तर १८ निवासी आणि २६ व्यावसायिक मालमत्तांना सुरक्षा उपायांसाठी नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याचे मुंबई अग्निशमन दलाने म्हटले आहे. महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाय अधिनियम, २००६अंतर्गत या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. कायद्यानुसार, प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला त्यांच्या अग्निशमन यंत्रणेतील दोष दुरुस्त करण्यासाठी जास्तीत जास्त १२० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या सोसायट्यांनी ३० दिवसांत दुरुस्तीचे काम सुरू न केल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई होऊ शकते.