मुंबई अग्निशामन दलामध्ये २०१८ मध्ये दाखल झालेला रोबो सध्या धूळखात पडला आहे. गेल्या दोन वर्षांत केवळ सात किरकोळ आगींच्या घटनांमध्ये या रोबोचा वापर करण्यात आला आहे. तांत्रिक मर्यादेमुळे रोबोचा वापर आता बेसमेंटमधील घटनांमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे हा रोबो आता अग्निशमन दलासाठी ‘पांढरा हत्ती’ ठरला आहे.
मुंबईत लागत असलेल्या भीषण आगींच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना आत जाऊन काम करणे धोकादायक असते. अशा वेळी आग विझवण्यासाठी आणि घटनास्थळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी रोबो वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काळबादेवी येथे लागलेल्या भीषण आगीत चार जवानांना आपला प्राण गमवावा लागला होता.
हे ही वाचा:
भारताच्या ‘वॅक्सिन’ मुत्सद्देगिरीला यश
संयुक्त राष्ट्रसंघ, क्वाड बैठकांसाठी मोदी अमेरिकेला रवाना
कितीही वॉर्ड पुनर्रचना करा, मुंबईसह अन्य महानगरपालिकेत आम्हालाच यश मिळणार
पंजाब राजस्थानच्या सामन्यात बॉलर्सचा बोलबाला
रोबो आणि त्याचे वाहन यावर साधारण ९० लाख खर्च करण्यात आले होते. २०१८ मध्ये मुंबई अग्निशमन दलाने हा रोबो विकत घेतला होता. रोबो आणि त्याचे वाहन हाताळण्यासाठी काही जवानांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. सुरुवातील दोन रोबो विकत घेण्याचे प्रस्तावित होते; मात्र प्रायोगिक तत्वावर एक रोबोट विकत घेण्यात आला होता. अग्निशमन दलातील रोबो निष्फळ ठरला असे म्हणता येणार नाही. आवश्यकतेनुसार रोबोचा वापर केला जातो. सध्या नवीन रोबो घेण्याचा विचार नसल्याचे मुख्य अग्निशमन दल अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले.
रोबोकडून असणाऱ्या अपेक्षा
- मोठ्या आगीच्या ठिकाणी वापर होईल.
- आगीच्या ठिकाणचे दर्जेदार लाइव्ह दृश्य पुरवणार
- अडचणीच्या जागेवरील आग विझवणार
- धूर आणि अधिक उष्णता असेल अशा ठिकाणी अधिक सोयीचा
रोबोच्या मर्यादा
- चढण असल्यास रोबो पुढे सरकत नाही.
- अडथळे पार करण्यास असक्षम
- अधिक धूर, उष्णता असल्यास रोबोचा उपयोग नाही.
- दर्जेदार छायाचित्र आणि व्हिडीओची मर्यादा