मुंबई क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद, अयान पठाण सर्वोत्तम खेळाडू

तेजस चाळके याला वेंगसरकर यांच्या तर्फे क्रिकेट बॅट हे विशेष पारितोषिक देण्यात आले.

मुंबई क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद, अयान पठाण सर्वोत्तम खेळाडू

माहुल येथील वेंगसरकर अकादमीच्या मैदानात झालेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत मुंबई क्रिकेट क्लब संघाने स्पर्धेत विजेतेपद पटकावताना दादर युनियन संघावर ८८ धावांनी मात केली. या स्पर्धेत अयान पठाण हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

हे ही वाचा:

साक्षीचा मारेकरी साहिल खानला न्यायालयीन कोठडी

महाराष्ट्राचे राजकारण थुकरट वळणावर

बांगलादेशातील अल्पसंख्याकांना सीएएची खरोखरच गरज आहे!

दोषींना कठोर शिक्षा होईल, कुणालाही सोडणार नाही!

प्रथम फलंदाजी करताना मुंबई क्रिकेट क्लब संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद १६६ धावांचे लक्ष्य उभारले. त्यांच्या मनोहर भूषण (२६) आणि अयान पठाण (४८) यांनी ८७ धावांची सलामी दिली. त्यानंतर तेजस चाळके (३३), अनुज गिरी (१९) यांनी देखील संघाच्या धावसंख्येत खारीचा वाटा उचलला. दादर युनियन संघाच्या प्रतापराज पुल्ला याने १९ धावांत ४ तर अनुज कोरे याने ३१ धावांत २ बळी मिळविले. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना दादर युनियन संघाने केवळ ४६ धावांतच ७ बळी गमावले तेव्हांच त्यांचा पराभव निश्चित झाला होता. नंतर क्रिश पारीख (२०) आणि अर्णव कुलकर्णी (१३) यांनी थोडाफार प्रतिकार केला ; पण अनुज अय्यर (१३/३), अंकुश पासवान (१०/२) आणि अयान पठाण (४/२) यांनी प्रभावी गोलंदाजी करून दादर युनियन संघाला ७८ धावांतच गुंडाळले.

या लढतीत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अयान पठाण यालाच अंतिम सामन्यातील आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून तेजस चाळके, सर्वोत्तम गोलंदाज म्हणून अंकुश पासवान आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून इनाम पेणकर यांना गौरविण्यात आले. तेजस चाळके याला वेंगसरकर यांच्या तर्फे क्रिकेट बॅट हे विशेष पारितोषिक देण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर तसेच एजिस फेडरलच्या धनश्री जोशी आणि टीम्मी मेहता यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना दिलीप वेंगसरकर म्हणाले की, क्रिकेट या खेळात फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणही तेवढेच महत्वाचे असते असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले. एजिस फेडरल इन्शुरन्स कप या १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ट्वेंटी २० हा क्रिकेट प्रकार दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय ठरत असताना तुम्हाला तुमच्या फिटनेसवर आणि क्षेत्ररक्षणावर अधिक मेहनत घेण्याची गरज आहे, कारण त्यामुळेच तुम्हाला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळविण्याची संधी असेल असेही ते पुढे म्हणाले.

संक्षिप्त धावफलक : मुंबई क्रिकेट क्लब – २० षटकांत ८ बाद १६६ (मनोहर भूषण २६, अयान पठाण ४८, तेजस चाळके ३३, अनुज गिरी १९; प्रतापराज पुल्ला १९ धावांत ४ बळी, अनुज कोरे ३१ धावांत २ बळी) वि.वि. दादर युनियन – १९.२ षटकांत सर्वबाद ७८ ( क्रिश पारीख २०, अर्णव कुलकर्णी १३; अनुज अय्यर १३ धावांत ३ बळी, अंकुश पासवान १० धावांत २ बळी, अयान पठाण ४ धावांत २ बळी). सामनावीर – अयान पठाण

Exit mobile version