मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष आणि सदस्य लालचंद राजपूत तसेच राजू कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पत्राला अखेर एमसीएच्या लोकायुक्त विजया ताहीलरामाणी यांच्याकडून उत्तर मिळाल्याचे कळते.
२३ मे रोजी त्यांनी लोकायुक्तांना लिहिलेल्या पत्राला एक महिना झाला होता. त्यामुळे त्यांच्या तक्रारीसंदर्भात आठवण करणारे आणि सुनावणी घेण्यासाठी आवाहन करणारे पत्र त्यांनी लिहिले होते. पण लॉकडाऊनच्या काळात त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता मात्र ताहीलरामाणी यांच्याकडून प्रतिसाद मिळाला असून ८ एप्रिलला आपण लिहिलेले पत्र मिळाले. अनलॉकमुळे ठराविक मर्यादेत एमसीए कार्यालय उघडल्यामुळे या पत्राची आपण लवकरच दखल घेऊ, असे ताहिलरामाणी यांच्याकडून त्या पत्रात नमूद करण्यात आल्याचे कळते.
हे ही वाचा:
‘लसीकरणाचे विकेंद्रीकरण करा, म्हणणाऱ्यांना केंद्रावरच विश्वास ठेवावा लागला’
मुंबई पोलिसांच्या वाहनाच्या ताफ्यात ‘एटीव्ही’
पुणे आग: मोदींनी जाहीर केली मदत, मुख्यमंत्री ठाकरे निद्रिस्त
राजपूत आणि कुलकर्णी यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सुधारणा समितीला एमसीएने बरखास्त केले होते. या समितीला बरखास्त करण्याचा अधिकार एमसीए अपेक्स कौन्सिलला नव्हता. आपल्या समितीला का बरखास्त करण्यात आले, अपेक्स कौन्सिलला तो अधिकार होता का, सध्या नियुक्त केलेल्या अनधिकृत क्रिकेट सुधारणा समितीला जोपर्यंत आमच्या पत्रांवर निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतेही निर्णय घेण्यास मनाई करावी, अशी मागणी या पत्रांत करण्यात आली आहे. विद्यमान क्रिकेट सुधारणा समितीची नियुक्ती रद्द करावी आणि राजपूत-कुलकर्णी यांच्या समितीला पुन्हा नियुक्त करावे अशीही मागणी त्यात आहे.
आता या पत्रांवर सुनावणी कधी होणार याची प्रतीक्षा आहे. सध्या तरी विनोद कांबळी, जतीन परांजपे, निलेश कुलकर्णी यांची समिती कार्यरत असून त्यांच्या शिफारशीनुसार मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक म्हणून माजी रणजीपटू अमोल मुझुमदार यांची नियुक्ती झाली आहे.