मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. २० ऑक्टोबरला ही निवडणूक होणार असून २८ सप्टेंबरला ही निवडणूक आधी होणार होती. मात्र पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता नवी तारीख जाहीर झाली आहे.
एमसीएने नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी जगेश सहारिया यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. येत्या २० ऑक्टोबरला पदाधिकाऱ्यांच्या ५ जागा आणि ९ सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होईल. २० सप्टेंबरला दुपारी ३ ते ६ यावेळेत ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर त्याच दिवशी निकालही जाहीर होतील.
सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील हे इच्छुक आहेत. दुसरीकडे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हेदेखील अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते. शिवाय सध्या उपाध्यक्ष असलेल्या अमोल काळेंचे नावही चर्चेत आहे.
हे ही वाचा:
PFI च्या निशाण्यावर होते संघाचे मुख्यालय
हा आहे गुलाम नबी आझाद यांचा नवा पक्ष
भारतात महिला ‘बॉस’ची संख्या वाढली
पाकिस्तान लष्काराचे हेलीकॉप्टर कोसळून सहा जवानांचा मृत्यू
सोमवारी एमसीएच्या क्लबच्या प्रतिनिधींची नावे जाहीर करण्यास सांगण्यात आले आहे. ४ ऑक्टोबरपर्यंत ही यादी जाहीर करायची आहे. हे प्रतिनिधी निवडणुकीत मतदान करणार आहेत. यातूनच उमेदवार आपले अर्ज भरणार आहेत. ६ ते १० ऑक्टोबर या कालावधीत हे अर्ज भरायचे आहेत. वैध उमेदवारांची नावे ११ ऑक्टोबरला जाहीर केली जातील. १४ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची तारीख देण्यात आली आहे. तर त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादीही जाहीर करण्यात येईल.
या निवडणुकीत एमसीए, बीसीसीआय, आयपीएल किंवा मुंबई इंडियन्स आयपीएल संघ आणि गरवारे क्लब कर्मचारी उमेदवारी अर्ज भरू शकत नाही. या निवडणुकीसाठी ज्या गटाला बाळ महाडदळकर यांचे नाव काढून टाकण्यात आले असून आता या गटाचे नाव शरद पवार गट असे ठेवण्यात आले आहे. बाळ महाडदळकर यांच्या कुटुंबियांनी आता त्यांचे नाव या गटासाठी वापरण्यास विरोध केल्यामुळे शेवटी या गटाला शरद पवार गट असे नाव देण्यात आले.