केदारनाथ यात्रेदरम्यान यात्रेकरूंची आणि त्यांची वाहतूक करण्यासाठी खेचरांचा वापर करण्यास अधिक पसंती दिली जाते. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचे वृत्त नुकतेच उघडकीस आले होते. मात्र तरीही ही खेचरेच येथे लोकप्रिय असल्याचे आढळले आहे. या खेचरांनी सध्या सुरू असलेल्या केदारनाथ यात्रेदरम्यान ८२.४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
त्याचवेळी येथील हेलिकॉप्टरने ५६.४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हे प्रमाण तब्बल ४६ टक्क्यांहून अधिक आहे.
गेल्या वर्षीदेखील हीच परिस्थिती होती. खेचरांनी गेल्या वर्षी १०१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते तर, हेलिकॉप्टरने ७५ कोटींची कमाई केली होती. यंदाच्या वर्षी चारधामला भेट देणाऱ्या ३० लाख यात्रेकरूंपैकी १०.३ लाख यात्रेकरूंनी केदारनाथ तीर्थक्षेत्राला भेट दिली आहे.
केदारनाथ यात्रा सुमारे सात महिने चालते. या संपूर्ण कालावधीत खेचर कार्यरत असतात. तर, सुमारे तीन महिन्यांच्या पावसाळ्याच्या कालावधीत हेलिकॉप्टरची संख्या लक्षणीयरीत्या कमी होते. कमी दृश्यमानता आणि सोसाट्याचा वारा यामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण करणे कठीण आणि धोकादायक असते. या वर्षी, उन्हाळ्यातही पाऊस पडला. एप्रिल आणि मे महिना हा कालावधीत केदारनाथला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या तुलनेने अधिक असते. मात्र या हंगामातच पाऊस पडल्याने हेलिकॉप्टरच्या प्रवासावर मर्यादा आल्या. काही हेलिकॉप्टर जुलै आणि ऑगस्टमध्येही अमरनाथ यात्रेसाठी उपलब्ध असतात. हेलिकॉप्टरबाबत अशी परिस्थिती असताना उपलब्ध खेचरांची संख्या मात्र अधिक असल्याने ती नेहमीच यात्रेकरूंसाठी उपलब्ध असतात.
हे ही वाचा:
टोमॅटोचे दर गगनाला का भिडले आहेत?
सदाशिव पेठेतील कोयता हल्ल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित
चुकीच्या तथ्यांसह ‘कुराण’वर डॉक्युमेंटरी बनवा, बघा काय होते ते
आता न्यूयॉर्कमध्ये दिवाळीत शाळांना सुट्टी!
रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाकडे एकूण सहा हजार ९३३ खेचरांची नोंद आहे आणि आणखी एक हजार खेचरे माल वाहून नेण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहेत. अधिका-यांचे म्हणणे आहे की बहुतेक यात्रेकरू देवळापर्यंतच्या चढावर खेचर घेऊन जाणे पसंत करतात. सोनप्रयाग आणि गौरीकुंड येथून सुमारे १.८ लाख भाविक यावर्षी केदारनाथला खेचर घेऊन गेले. त्यामुळे खेचरांच्या मालकांची सुमारे ५४ कोटी ८० लाखांची कमाई झाली. सुमारे एक लाख ३४ हजार यात्रेकरूंनी परतीसाठीही खेचरांनाच पसंती दिली. त्यातून खेचरमालकांना २७ कोटी ५० लाखांचे उत्पन्न मिळाले.
खेचरावरून प्रवास करण्याचा खऱ्च तुलनेने कमी आहे. केदारनाथ बेस कॅम्प ते सोनप्रयाग या १८ किमीच्या प्रवासासाठी एका खेचर सवारीसाठी प्रति यात्रेकरू तीन हजार रुपये मोजावे लागतात. हेलिकॉप्टरने केदारनाथ आणि परतीच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती सुमारे पाच हजार रुपये खर्च येतो.