कोरोनाच्या कठीण काळात ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी हे महाराष्ट्राच्या मदतीला धावून आले आहेत. अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. रिलायन्सच्या जामनगर येथील प्लँटमधून महाराष्ट्रासाठी १०० मॅट्रीक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे.
भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे, तर महाराष्ट्रात मात्र या लाटेचे रूपांतरण त्सुनामीत झालेले आहे. महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील जिल्हे सर्वाधिक आहेत. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेत अनेक गोष्टींची कमतरता जाणवत आहेत. कुठे रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत, तर कुठे रेमडेसिवीरची कमतरता जाणवत आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजनचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे.
हे ही वाचा:
ठाण्यातील जम्बो कोविड सेंटर वापराविना
नागपूरच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत १०० खाटांचे कोविड सेंटर
सतत खोटारडी टीका केल्यावर फोन कोणत्या तोंडाने करायचा?
अशा परिस्थितीत महाराष्ट्रासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मदतीचा हात दिला आहे. अंबानी यांच्या रिलायन्सच्या जामनगर येथील प्लँट मधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. या ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात विभागीय आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती समन्वयाचे काम करणार आहे. महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून यासंबंधीची माहिती दिली.
रिलायन्स च्या जामनगर प्लँट मधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार.
विभागीय आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेल.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 13, 2021
एकीकडे अंबानी यांच्या नावाने सतत राजकीय टीका करणारे पक्ष आणि नेते महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत. तरीही अंबानी यांनी कोणताही पूर्वग्रह न ठेवता महाराष्ट्र सरकारला मदत केली आणि राज्यातील जनतेला मदतीचा हात दिला.