भाजपा खासदार ज्योतिर्मय महतो यांनी मोहम्मद युनूस यांना देण्यात आलेला नोबेल पुरस्कार काढून घेण्याबाबत नोबेल समितीला पत्र लिहिले आहे. भाजपा खासदाराने नोबेल समितीला लिहिलेल्या पत्रावर लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) खासदार अरुण भारती यांनीही प्रतिक्रिया दिला आणि पुरस्काराचे पुनरावलोकन केले जावे असे म्हटले.
हसीना शेख यांनी बांगलादेश सोडल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. मात्र, याकाळात अल्पसंख्याकांवर विशेषतः हिंदुंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले आणि अजूनही अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. परंतु, बांगलादेश सरकार अल्पसंख्याकांचे संरक्षण तर सोडाच आरोपींवर कारवाई देखील करताना दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर मोहम्मद युनूस यांना देण्यात आलेला शांततेचा नोबेल पुरस्कार परत घेण्याची मागणी भाजपा खासदाराने केली आहे. भाजपा खासदार ज्योतिर्मय महतो यांनी तसे नोबेल समितीला पत्र लिहिले आहे.
आयएएनएसच्या वृत्तानुसार, लोजपा (रामविलास) खासदार अरुण भारती यांनी म्हटले, मोहम्मद युनूस यांना शांततेचा नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यात दिसलेल्या बदलांचा विचार करणे आवश्यक आहे. मोहम्मद युनूस यांना जेव्हा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता, तेव्हा त्यांच्या योगदानाचा विचार करून हा पुरस्कार देण्यात आला होता, परंतु सध्या बांगलादेशातील त्यांच्या कारवाया आणि प्रशासनाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. नोबेल समितीने या विषयाचा आढावा घ्यावा.
हे ही वाचा :
लोकांच्या मनातील मुख्यमंत्र्याची दांडी का उडविली?
हा घ्या पुरावा… मारकडवाडीने कुणा एका पक्षाला पाठिंबा दिला नाही!
प्रशासनाने निवडणूक घ्यावी, आम्ही तयार आहोत!
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध होणार निवड!
अरुण भारती म्हणाले की, भाजप खासदार ज्योतिर्मय महतो यांनी लिहिलेले पत्र योग्य असून याचा तपास व्हायला हवा. जर एखाद्या व्यक्तीला नोबेल पारितोषिक देण्यात आले असेल आणि नंतर त्याच्या कृतीमुळे ती व्यक्ती त्या पुरस्कारास पात्र ठरत नसेल तर त्याचा आढावा घेतला पाहिजे. ज्या तत्त्वांसाठी त्याचा सन्मान करण्यात आला त्या तत्त्वांच्या विरोधात कोणाची कृती होत असेल तर त्याचा पुनर्विचार व्हायला हवा.
याशिवाय दरभंगा येथील दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीवर प्रतिक्रिया देताना भारती म्हणाले की, सरकारने अशा घटनांची चौकशी करावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशा घटना घडू नयेत आणि अशा घटना घडत असतील तर त्यावर संवादातून तोडगा निघायला हवा. यानंतरही समस्या कायम राहिल्यास त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे अरुण भारती म्हणाले.