पालघर जिल्ह्यातील पाचघर गावात गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्यानंतर रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी निघालेली जीप रस्त्यावरील चिखलात रुतून बसली. याच पाचघरसह रस्त्यांचा विकास करण्यासाठी सुमारे ६४ लाख रुपये खर्च करण्यात आले असले, तरी या गावातील रस्त्याची अवस्था बिकट आहे. चिखलात रुतलेली जीप पुढे ढकलण्यासाठी गावकऱ्यांना आठ किलोमीटर चिखलातून धक्का मारावा लागला. त्यामुळे गावकऱ्यांनी खराब रस्त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. इतका मोठा खर्च करूनही आदिवासी बांधवांचा रस्त्याबाबत फरफटच होत आहे.
पाचघर गावातील ज्योती दोडे यांना प्रसूतीच्या वेदनेस सुरुवात झाली. वेदना सुरु झाल्यानंतर त्यांना जीपमधून रुग्णालयात नेले जात होते. त्यातच त्यांची जीप चिखलात रुतली व चाके जागेवर फिरू लागली. महिलेचा जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी आठ किलोमीटर पर्यंत धक्का मारला. त्यानंतर खराब रस्त्याची चर्चा सुरु झाली आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. या रस्त्यासाठी पालघर जिल्ह्याने १४ लाख रुपये खर्च केले आहेत. पाचघरच्या विकासावर आता पर्यंत एकूण ६४ लाख रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे. त्यानंतरही या गावच्या रस्त्याची स्थिती अत्यंत बिकट असल्याने विकासकामांबाबत गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
हे ही वाचा:
निर्बंधमुक्त दहीहंडीमुळे गोविंदा घेतायत मोकळा श्वास
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही भर्ती व्हायचे होते लष्करात
लोकांना डोलो देऊन डॉक्टरांनी केली १ हजार कोटींची मज्जा
समीर वानखेडे यांना धमकीचा मेसेज
वैद्यकीय सेवेचे तीन-तेरा…
पाचघर येथील गर्भवती महिलेवर जिल्ह्यातील एकाही रुग्णालयात उपचार झाले नाहीत. त्यामुळे त्या महिलेला सुमारे ८० किलोमीटर प्रवास करून थेट शहरात आणावे लागले. या पूर्वीही असे प्रकार झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागात वैद्यकीय सेवांचा बोजवारा उडालेला आहे. आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही रुग्णांना उपचार मिळत नसल्याने, आरोग्य निधीचा खर्चही संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.