म्युकरमायकोसिस- दुर्लक्षित, अल्पपरिचित आजार

कोविडच्या दुसऱ्या लाटेत, काहीसा अल्पपरिचित आणि नकोसा असा प्रकार नावास आला आहे - म्युकरमायकोसिस. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जनता काही यापासून फार अनभिज्ञ राहिलेली नाही; पण विविध स्त्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीबद्दल मात्र साशंकता आहे. त्या शंका दूर करण्यासाठी हा लेख -

म्युकरमायकोसिस- दुर्लक्षित, अल्पपरिचित आजार

म्युकरमायकोसिस हा नवीन आजार बिलकूल नाही. हा आजार प्रामुख्याने ‘ऱ्हाईजोपस’ या बुरशीमुळे होतो. या बुरशीचे ‘स्पोअर्स’ (Spores) वातावरणात सर्वत्र असतात. विशेषतः त्यांना आर्द्रता प्रिय असते. मात्र हा आजार सर्वांनाच होत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती फारच कमकुवत झाली आहे, त्यांना हा धोका अधिक असतो. ज्यांना दिर्घकाळ डायबिटीस आहे; याशिवाय अवयव प्रत्यारोपण स्विकारणारे रुग्ण, कर्करोगाचे रुग्ण यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती फारंच कमी असते, त्यांच्यात हा आजार दिसून येतो.

कोविडमध्ये तिसऱ्या टप्प्यापासून रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच पायावर धोंडा मारावा त्याप्रमाणे रौद्ररूप धारण करते. रोगप्रतिकारशक्तीच्या या आत्मघातकी स्वरुपास शांत करण्यासाठी रुग्णांमध्ये सध्या स्टेरॉइड्स, टोसिलीझुमॅब अशा औषधांचा वापर होतो. शिवाय दिर्घकाळ बाहेरून मिळणाऱ्या ऑक्सिजनवर अवलंबून असल्याने श्वसनसंस्थेच्या स्वसंरक्षणावर विपरीत परिणाम झालेले असतात. याशिवाय ऑक्सिजन देण्यासाठी वा इतर कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या नळ्या, मास्क्स, रुग्णालयातील कपडे, बिछाने, भिंती यांच्यात आर्द्रता असल्यास रुग्णांचा म्युकरशी संपर्क येण्याची व या आजारास बळी पडण्याची शक्यता वाढते. डायबिटीससारख्या सहव्याधींमुळेही या आजाराचा धोका वाढतो.

हे ही वाचा:

अरबी समुद्रावर घोंगावते आहे वादळ

सीईटीच्या तारखा बारावीच्या परिक्षेनंतर घोषित होणार

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावणार?

राज्याच्या अधिकारातील सवलती तातडीने मराठा समाजाला द्या

चेहऱ्याच्या एका बाजूला सूज, खोकला, तोंडात टाळ्याला काळपट थर दिसणे, दम लागणे, ताप, नाक चोंदणे, डोकेदुखी अशी लक्षणे या आजारात दिसतात. शस्त्रक्रिया आणि काही प्रतिकवक (Antifungal) औषधे वापरून या आजारावर उपचार करता येतात. आजारावर कोणतीही लस नाही.

हा आजार कोविडप्रमाणे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होताना दिसत नाही. तो विशेषतः आर्द्रता वा धूळ, बागेतील माती यांच्या संपर्कात आल्याने होतो.

या आजारास प्रतिबंध म्हणून स्टेरॉइड्स, प्रतिजैविके अशा औषधांचा अत्यंत काटेकोर वापर,रुग्णालयातील साधनांची व्यवस्थित स्वच्छता व निर्जंतुकीकरण इ. बाबींची रुग्णालये व  डॉक्टर यांच्याकडून काळजी घेतली जाणे आवश्यक आहे; तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे न घेणे, घरातील बिछाने, चादरी यांची पुरेशी स्वच्छता, माती व धूळ यांच्या संपर्कात न येणे, दमट मास्क न वापरणे इ. काळजी रुग्णांनी घ्यायला हवी. तसेच कोविडचे वा अन्य कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरीत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Exit mobile version