अनेक प्रवासी आणि वाहतूक कार्यकर्त्यांनी मुंबईच्या रस्तावरून धावणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या एस.टी बसेस खटारा दर्जाच्या असल्याचे म्हटले आहे. मुंबईच्या रस्त्यांवरून अनेक ठिकाणी सध्या बेस्ट बसेसपेक्षा एस.टी बसेस अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. प्रवाशांच्या मते बसेसमध्ये दिव्यांची अवस्था अतिशय वाईट आहे, काही काही बस अतिशय अस्वच्छ आहेत. परंतू बेस्ट प्रशासन मात्र कोविड काळात प्रवाशांच्या सोईसाठी या बसेसचा उपयोग होत असल्यामुळे खुशीत आहे.
बेस्ट प्रशासनाने या काळात १,००० बसेस राज्य परिवहन महामंडळाकडून भाडे तत्त्वावर घेतल्या आहेत. “ही तात्पुरती सोय असून परिस्थिती पूर्वपदावर आली की या बसेस काढून टाकल्या जातील” असे बेस्टच्या एका उच्चाधिकाऱ्याने सांगितले आहे. ते पुढे म्हणतात, “राज्य परिवहन महामंडळाने आम्हाला गर्दीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी बसेसच्या फेऱ्या वाढवायला फार मदत केली आहे. या बसेस रोज ५ लाख प्रवाशांची ने- आण करत आहेत. त्यामुळे बस थांब्यावर बसची वाट बघायला लागणारा कालावधी कमी झाला आहे. बसेस इतक्याही वाईट नाहीत.”
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेस्ट ५०० बसेस अधिक मोठ्या कालावधीसाठी भाडे कराराने ठेवून घेण्याबाबत, सरकारकडे लवकरच अर्ज करणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्याने बसेसची उत्तम निगा राखली असल्याचे ठासून सांगितले आहे.
मुंबई मनपातील विरोधीनेते रवि राजा यांनी, “हे खोटे आहे. कोविड काळात अस्वच्छ बसेस प्रवाशांना नक्कीच नको आहेत.” त्यांनी बेस्ट प्रशासनाला यात लक्ष घालून प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या बसेस मिळण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे. “वास्तविक बेस्ट प्रशासनाने, शाळांच्या बसेसचा वापर करायला हरकत नाही. त्या उत्तम अवस्थेत आहेत.” असेही ते म्हणाले. शाळा बस-मालक संघटना परिस्थिती पूर्ववत होऊन शाळा सुरू होईपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मदत करायला उत्सुक आहे.
नागरी हक्क कार्यकर्ते इरफान माचीवाला यांच्या मते या बसेस अयोग्य आहेत. त्यांच्यामते, या बसेसमधील दिवे फारच मंद आहेत. त्या स्वच्छदेखील नसतात आणि बाहेरूनही त्या अतिशय खराब अवस्थेत आहेत. त्यातल्या काही तर थेट भंगारात काढण्याच्या योग्यतेच्या वाटतात.
बेस्ट प्रवाशांच्या मते या बसेसची अवस्था भयंकर आहे. त्या रस्त्यावर धावण्यास योग्य नाहीत आणि मुंबईच्या रस्त्यावर धावण्यास अजिबातच योग्य नाहीत. त्यांना तात्काळात भंगारात काढण्यात यावे. भारताच्या आर्थिक राजधानीतील लोकांना अधिक उत्तम दर्जाच्या बसेस मिळाल्या पाहिजेत, असे काही प्रवाशांचे मत असल्याचे समजले.
नुकत्याच झालेल्या बैठकीत, बेस्टच्या काही अधिकाऱ्यांनीच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अस्वच्छ असल्याची तक्रार केली होती.