मुंबई पोलीस दलात ११ महिन्याच्या कंत्राटावर पोलीस भर्ती केली जाणार असल्याच्या वृत्ताने खळबळ उडवून दिली होती, परंतु मुंबई पोलीस दलात या पद्धतीने कुठलीही भरती होणार नसून मुंबई पोलीस दलाला राज्य सुरक्षा महामंडळाकडून तात्पुरते मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. हे मनुष्यबळ म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे तीन हजार जवान मुंबई पोलिस दलात मदतनीस म्हणून येणार आहे.
मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक यांची ४० हजार ६२३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी पोलीस शिपाई पदाची सुमारे दहा हजार पदे रिक्त आहे.मुंबई पोलिसांना कमी मनुष्यबळात दैनंदिनी कामे इतर कर्तव्यासाठी अपुरे पडत आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई पोलिस भरती मधून मुंबई पोलीस दलाला सात हजार पोलीस शिपाई नव्याने मिळणार आहे. त्यानंतर देखील मुंबई पोलीस दलात ३ हजार पोलीस शिपाई पदे रिक्त राहणार आहे.
हे ही वाचा:
मणिपूर विवस्त्र धिंड प्रकरणातील सातव्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
टँकरमधून आरडीएक्स नेत असल्याचा खोटा फोन करणारा अटकेत
अडीच वर्षात विरोधकांना ठाकरे सरकारने फुटकी कवडी दिली नाही
भरती प्रक्रिया व प्रशिक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कर्तव्यासाठी २ वर्षांनंतर आयुक्तालयास मनुष्यबळ उपलब्ध होणार आहेत. पोलिस शिपाई पदे विहीत मार्गाने भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत किमान ११ महिने कालावधी साठी एकूण ३ हजार मनुष्यबळ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा कडून उपलब्ध करुन देण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडून गृहविभागाकडे करण्यात आली होती.
मुंबई पोलिसांच्या या मागणीला राज्य शासनाने मान्यता देण्यात आली आहे, राज्य सुरक्षा महामंडळाकडून ११ महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने मुंबई पोलिसांना ३ हजार मनुष्यबळ प्रदान करण्यात यावे असे शासनाने काढलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. राज्य सुरक्षा महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा दल (एमएसएफ) चे तीन हजार जवान मुंबई पोलीस दलात ११ महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने पुरविण्यात येणार आहे.
दरम्यान, यासंदर्भात विधिमंडळातही प्रश्न उपस्थित करण्यात आला. तेव्हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत अशा प्रकारची कोणतीही भर्ती करण्यात येणार नाही. अशी भर्ती होत नाही, असे सांगितले.