सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा मानहानीकारक पराभव झाला. असे असले तरीही भारताचा ३६० फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत आपला दबदबा कायम राखला आहे. आयसीसीने बुधवारी टी-२० ची क्रमवारी जाहीर केली. त्यात सूर्या पहिल्या स्थानी अजूनही तळपतोय. सूर्यकुमार यादवने अलीकडेच ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात आपल्या तुफानी खेळीने प्रतिस्पर्धी संघांना सळो की पळो केले होते. सूर्याच्या याच कामगिरीच्या जोरावर सूर्यकुमार टी-२० च्या क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला.
सूर्याचे घसरले रेटिंग
इंग्लंविरुद्ध झालेल्या सेमीफायनलमध्ये सूर्या फार काही चमक दाखवू शकला नाही. तो अवघ्या १४ धावा बनवून तंबूत परतला. याच कारणामुळे त्याच्या रेटिंगमध्ये १० गुणांची घसरण झाली. असे असूनही त्याने ८५९ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. सूर्याने टी-२० विश्वचषकात १८९.६८ च्या स्ट्राइक रेटने २३९ धावा चोपुून ठोकल्या. त्यात तीन दे दणादण अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सूर्यकुमार तिसऱ्या स्थानी आहे.
इंग्लंडचा फलंदाज हॉल्सने भारताविरुद्धच्या सेमीफायनमध्ये ४७ चेंडूत नाबाद ८६ धावांचा रतीब घातला. या तडाखेबाज खेळीमुळे त्याने २२ स्थानावरून १२ व्या स्थानी गरुडझेप घेतली आहे. टॉप-१० मध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा रिले रोसो सातव्या, तर न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स आठव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका एडन मार्कराम पाचव्या स्थानावर राहिला. तर डेव्हन कॉनवे चौथ्या क्रमांकावर घसरला.
हेही वाचा :
बुलेट ट्रेनचे काम सुस्साट! अखेरचा १३५ किमीचा टप्पा शिल्लक
तिकीट ‘मिळवून’ देणाऱ्या ‘आप’च्या आमदार मेहुण्याच्या मुसक्या आवळल्या
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी-शी जिनपिंग एकमेकांना भेटले, झाला संवाद
टॉप-१० मध्ये विराट नाही
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ११ व्या स्थानावर कायम आहे. कोहली टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा त्याने ठोकल्या होत्या.
आदिल रशीदच्या क्रमवारीत सुधारणा
गोलंदाजच्या क्रमवारीत इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीदने तिसरे स्थान पटकावले आहे. रशिदने उपांत्य फेरीत भारताविरुद्ध तर फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध धडाकेबाज कामगिरी केली होती. त्याचवेळी, सामनावीर आणि फायनलमध्ये सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या सॅम करनने पाचव्या स्थानी झेप घेतली. लंकेचा वानिंदू हसरंगा अव्वल स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान दुसऱ्या स्थावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसऱ्या आणि भारताचा हार्दिक पंड्या तिसऱ्या स्थावर आहे.