संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्या खासदारांनी जाणुनबुजून गोंधळ निर्माण केल्यामुळे त्यांना निलंबित केल्याचे सांगत राज्यसभाध्यक्ष जगदीप धनकड यांनी या संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना २५ डिसेंबर रोजी दोघांमध्ये बैठक घेण्याबाबत सुचवले आहे.
खासदारांनी राज्यसभेच्या वेलमध्ये येऊन राज्यसभाध्यक्षांच्या खुर्चीसमोर घोषणाबाजी तसेच, फलकबाजी करून जाणुनबुजून गोंधळ निर्माण केला. त्यामुळे त्यांना संसदेतून निलंबित केल्याचे राज्यसभाध्यक्ष धनकड यांनी म्हटले आहे. संसदेचे कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी कामकाजादरम्यान विस्तृत स्थगिती देण्यात आली होती. त्यांनी चेंबरमध्ये खासदारांशी चर्चा करण्याचेही सुचवले होते. मात्र खासदारांनी जाणुनबुजून आणि पूर्वनियोजित पद्धतीने गोंधळ निर्माण केला, असे धनकड यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
सावरकरांवरील कार्यक्रमाला पाठवले म्हणून प्राचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई
मराठा समाजाला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा मुहूर्त
कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारला हिजाबचा पुळका; बंदी उठवण्याच्या सूचना
१३ डिसेंबर रोजी संसदेची सुरक्षा भंग करून काही तरुणांनी घोषणाबाजी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली होती. यावेळी गोंधळ निर्माण होऊन लोकसभा आणि राज्यसभेच्या सुमारे १४६ खासदारांना निलंबित करण्यात आले. १४६पैकी १०० खासदार लोकसभेचे तर, ४६ राज्यसभेचे आहेत. तर, वेळापत्रकाच्या एक दिवस आधीच म्हणजेच २१ डिसेंबरला राज्यसभेचे कामकाज बेमुदत स्थगित करण्यात आले. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून संवाद आणि चर्चेसाठी त्यांची तयारी दर्शवली होती. तसेच, संसद सुरक्षाभंगासंदर्भात अर्थपूर्ण चर्चेसाठी विरोधी पक्ष तयार होते.
त्यासाठी विविध नोटिसा सादर करण्यात आल्या होत्या. मात्र त्या स्वीकारल्या गेल्या नाहीत आणि विरोधी पक्षाच्या खासदारांना एक-दोन मिनिटेही बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही, याकडे खर्गे यांनी राज्यसभाध्यक्षांचे लक्ष वेधले. त्यावरही धनकड यांनी उत्तर दिले आहे. ‘तुम्ही दिलेला विश्वास कृतीमध्ये उतरल्याचे दिसले नाही. संपूर्ण अधिवेशनकाळात मी सातत्याने लेखी आणि तोंडी विनंत्या करूनही खासदारांनी माझे म्हणणे ऐकले नाही. चेंबरमध्ये चर्चेचा माझा प्रस्ताव नाकारल्यामुळे मला सदनात गोंधळाला सामोरे जावे लागले,’ असे धनकड यांनी पत्रात नमूद केले आहे.